अमरावती प्रतिनिधी :- अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेली अमरावती मुंबई अंबा एक्सप्रेस तात्काळ सुरू करण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील नागरीकांना शासकीय कामे करण्याकरीता व रुग्णांना विविध आजारांच्या शस्त्रक्रीया व आरोग्य तपासणी करण्याकरिता अमरावती – मुंबई जावे लागते. परंतू कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्णत: लॉकडाऊन करण्यात आल्याने रेल्वे प्रवासी वाहतूक बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना व विविध आजारांच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे . नागरिकांच्या व रुग्णांच्या तात्काळ समस्या सोडविण्यासाठी अमरावती – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस (अंबा एक्सप्रेस) तातडीणी सुरु करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे केली आहे.