अणुबाँब हल्ल्याची पाकिस्तानची धमकी
रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली
इस्लामाबाद/दि. २१ – भारतासोबत वाढत्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानमधील वाचाळवीर रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला थेट अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे. आता भारतासोबत छोटे युद्ध होणार नाही, तर थेट अणूबॉम्बनेच हल्ला करण्यास पाकिस्तान सज्ज असल्याची गरळ त्यांनी ओकली. याआधीही शेख रशीद अहमद यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. शेख रशीद यांनी जागतिक राजकारणावरही भाष्य केले. चीनच्या विरोधात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटन हे देश उभे आहेत. तर, चीन नवा मित्र नेपाळ, श्रीलंका, इराण, रशिया या देशांसोबत एकत्र येत आहे. पाकिस्तानलाही चीनसोबत उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी म्हटले, की आता भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास छोटी लढाई, युद्ध वगैरे होणार नाही. आता थेट शेवटची लढाई होईल. पाकिस्तानचे शस्त्र अगदी योग्य ठिकाणी हल्ला करण्यास सक्षम आहे. पाकिस्तान भारताच्या आसामपर्यंतही हल्ला करण्यास सक्षम आहे. त्यामुळे भारतासोबत आता थेट अणुयुद्धच होईल अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.
काही दिवसआधी त्यांनी भारताला अणू हल्ल्याची धमकी दिली होती. पाकिस्तानकडे १२५ ग्रॅम आणि पाव किलोचे अणू बॉम्ब आहेत. एखाद्या विशिष्ट खास ठिकाणावरील लक्ष्याचा वेध घेण्यास हे अणूबॉम्ब सक्षम असल्याची धमकी त्यांनी दिली. शेख यांच्या या वक्तव्याची ‘सोशल मीडिया‘वर यूजर्सनी खिल्ली उडवली होती. मागील वर्षीही शेख रशीद यांनी भारताला धमकी दिली होती. काहीजणांना वाटत असेल भारत-पाकिस्तानमध्ये चार-पाच दिवस रणगाडे, तोफा चालतील. हवाई हल्ले होतील. समुद्रात नौदल एकमेकांसमोर उभे ठाकतील. पण आता तसे होणार नसून थेट अणू हल्लाच होणार असल्याची धमकी त्यांनी दिली होती.
पाकच्या लष्करप्रमुखांना नाकारली भेट
दरम्यान, पाकिस्तान आणि सौदी अरेबियातील संबंध आणखी बिघडत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सौदी अरेबियाविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर सौदी अजूनही नाराज असून पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बावजा यांना भेटण्यास क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानसमोरील आर्थिक आणि तेल संकट कायम आहे. काही दिवसांपूर्वीच बावजा यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता.