अजूनही घरून काम करण्यास प्राधान्य
नवी दिल्ली/ दि.१७ – भारतातील ५२ टक्के कर्मचारी आणि व्यवस्थापन स्तरावरील ६४ टक्के कर्मचारी घरबसल्या काम करण्यास प्राधान्य देत आहेत. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी लागू झाल्यानंतर बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. कर्मचारी सध्या घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत. कॉर्पोरेट कर्मचा-यांचे सर्वेक्षण सव्र्हिस नाऊ या क्लाउड-आधारित कंपनीने एक ते दहा सप्टेंबर दरम्यान केले. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड्स, भारत, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील पाचशेहून अधिक कंपन्यांमधील आठ हजार शंभर कार्यालयात हे सर्वेक्षण करण्यात आले. याशिवाय सीईओ, सीटीओ, सीएफओ (सी-सूट) इत्यादी या कंपन्यांच्या जवळपास नव्वद हजार अधिका-यांचाही समावेश आहे. या सर्वेक्षणात मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर, फायनान्स सव्र्हिसेस, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि टेलिकॉम इंडस्ट्रीजमधील सुमारे एक हजार कर्मचारी आणि व्यवस्थापन स्तरावरील शंभर प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. सर्वेक्षणानुसार, भारतातील लोकांनी हा डिजिटल बदल स्वीकारला आहे आणि देशात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारतातील ७४ टक्के अधिका-यांनी कबूल केले, की त्यांचे ऑनलाईन काम सुरू आहे. सर्वेक्षण केलेल्या इतर देशांमध्ये, अमेरिकेत ८९ टक्के, ब्रिटनमध्ये ९८ टक्के आणि ऑस्ट्रेलियामध्ये ९८ टक्के लोक ऑनलाईन काम करतात.