नगर दि . ८ – ‘सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा बिहार निवडणुकीशी अजिबात संबंध नाही. मुख्यमंत्री म्हणून बिहारच्या सुपुत्राबद्दल जी भूमिका घ्यायला हवी, तीच भूमिका नितीशकुमारांनी घेतली आहे. इतर मुख्यमंत्र्यांनीही हेच केले असते. आपल्या राज्यातील एखाद्या भूमिपुत्रासोबत अशी दुर्घटना झाली असती, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नितीशकुमारांसारखीच भूमिका घेतली असती,‘ असे मत खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
आमदार रोहित पवार यांनी सुशांतqसह प्रकरणावरून भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली होती. ‘भाजपचा सोशल मीडिया सक्षम आहे. या मीडियावर एखादा ट्रेंड चालवणे, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमते. भाजपचे नेते शब्दात खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. आज सुशांतqसह राजपूत प्रकरणात तेच चालू आहे,‘ अशी टीका पवार यांनी केली होती. पवार यांच्या वक्तव्याचा खासदार विखे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीनंतर बोलत होते.
डॉ. विखे म्हणाले, की सुशांतसिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी लागली आहे. कालच संबंधित अभिनेत्रीची आठ तास चौकशी झाली आहे. या प्रकरणातील सत्य निश्चित जनतेसमोर येईल. आमचा सरकारवर आक्षेप नाही, पोलिसांवर आक्षेप नाही. आमचे तर केवळ एवढेच मत आहे, की सत्य बाहेर आले पाहिजे. आम्ही या प्रकरणाचे राजकारण करीत नाही. सीबीआय चौकशी चालू आहे. सीबीआय राजकारण करते, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मुळात सीबीआय स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडावी. त्यांचा सीबीआयवर विश्वास आहे का? सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे का ? हेही त्यांनी स्पष्ट करावे, असे विखे म्हणाले.
‘सोशल मीडिया‘चा वापर हा फक्त भाजपच करत नाही, सर्वंच पक्षाचे लोक करतात. महाविकास आघाडीचे आमदार, मंत्री हे या माध्यमातून वेगळा अजेंडा राबवतात. जी कामे झाले नाहीत, ती पण झाली असे दाखवतात. एवढेच काय, राष्ट्रवादीचे आमदार ट्रॅक्टर चालवतानाचे, एखाद्या हॉस्पिटल बाहेर औषध फवारणी केल्याचे, उद्घाटन केल्याचे फोटो ‘सोशल मीडिया‘वर टाकत असतात,‘ असा पलटवार विखे यांनी केला.
भाजपने केलेल्या कामाची उद्घाटने
भूमिपूजने करून ती कामे करण्यासाठी सरकारकडे निधी आहे का, असा प्रश्न खा. विखे यांनी उपस्थित केला. भाजपच्या लोकांनी केलेल्या कामाची उद्घाटने आता होऊ लागली आहेत. हीच कामे दाखवून त्याचे श्रेय ते घेत आहेत. आता आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आमच्या काही भावना जनतेकडे पोहोचण्यासाठी आम्ही ‘सोशल मीडिया‘चा वापर करणारच,‘ असे ते म्हणाले