नागपूर/दि.१६– गेल्या काही दिवसांत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी केलेली विधाने आणि त्यानंतर शरद पवार यांनी त्याबाबत दिलेली संतप्त प्रतिक्रिया यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच पवार कुटुंबामधील अंतर्गत मतभेद दूर करण्यासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा काही विषयच नाही आहे, असे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. तसेच पार्थ पवार हा विषयही पक्षासाठी काही मोठा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच जय श्रीराम म्हणत अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा दिला होता. त्यावरून राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली होती. तसेच पार्थ पवार हे अपरिपक्व असल्याचे विधान शरद पवार यांनी केले होते.
दरम्यान, काँग्रेसच्या नाराजीवरही प्रफुल्ल पटेल यांनी सूचक विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही मतभेदांवर चर्चेतून मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. मात्र आता राज्यात आम्ही मोठे झालो आहोत. आधी काँग्रेस होती. तसेच आजच्या घडीला आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन चाललो आहोत. तसेच आता काँग्रेसने राष्ट्रवादीलाही विदर्भात स्थान दिले पाहिजे, अशी मागणी करत आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत प्रफुल्ल पटेल यांनी सुचक विधान केले.