मराठी

जिल्ह्यात उपचार सुविधा वाढविण्यासाठी हॉटेल्सचे रुग्णालयांत रूपांतर

उपचार सुविधांसाठी विविध पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न

अमरावती, दि. 6 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना उपचार सुविधांसाठी विविध पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. खासगी रूग्णालयांतही नॉन-कोविड रुग्ण व कोविड रूग्णासाठी स्वतंत्र कक्ष असण्याची गरज लक्षात घेऊन त्यासाठी काही हॉटेल्सच्या इमारतींचे रुग्णालयात रूपांतर करण्याची प्रक्रिया होत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
श्री. नवाल म्हणाले की, शासकीय रूग्णालयांप्रमाणेच खासगी रूग्णालयांतही विविध आजारांच्या रूग्णांवर उपचार होत असतात. आता कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांनाही कोरोनाबाधितांवर उपचारासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांशी चर्चा करून खासगी रूग्णालयांना त्यांच्या आवश्यकतेनुसार काही हॉटेलच्या जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अशा हॉटेलाचे इस्पितळात रूपांतर करताना आवश्यक उपचार सुविधा व इतर प्रक्रियेच्या निकषांच्या पूर्ततेसाठी परवानगी प्रक्रिया महापालिकेकडून राबवली जात आहे.
होम आयसोलेशनसाठीही परवानगी प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. हेल्थलाईनद्वारे गृह विलगीकरणातील, तसेच बरे होऊन घरी गेलेल्या व विलगीकरणात असलेल्या रूग्णांशी नियमित संपर्क ठेवून आवश्यक आहे. सद्य:स्थिती पाहता दर शुक्रवारी सायंकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय यापुढेही कायम राहील. नागरिकांनी या काळात उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळून कोरोना प्रतिबंधासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कापूस खरेदीची प्रक्रिया
जिल्ह्यात कापूस खरेदीला गती देण्यासाठी खरेदी केंद्राची संख्या वाढविणे, केंद्रासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, नोंदणीची मुदत वाढविणे, जिनींगच्या संख्येत वाढ आदी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. कापूस खरेदीची प्रक्रिया जवळजवळ पूर्णत्वास गेली असून, पणन महासंघ व सीसीआय या दोहोंकडून सुमारे 49 हजार 344 शेतक-यांकडून साडेतेरा लाख क्विंटलहून अधिक कापूस खरेदी झाल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button