वाॅलमार्ट भारतातून तिप्पट निर्यात करणार
नवी दिल्ली/दि. ११ – किरकोळ विक्री क्षेत्रात दबदबा असलेल्या वॉलमार्टने येत्या सात वर्षांत भारतातून निर्यातीत तीनपट वाढ करण्याची घोषणा केली आहे. वॉलमार्ट म्हणते, की 2027 पर्यंत ही कंपनी वार्षिक 10 अब्ज डॉलर्स किंमतीच्या वस्तू भारतातून निर्यात करील. जागतिक बाजारपेठेसाठी मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून भारत विकसित करण्याच्या सरकारच्या धोरणाच्या समर्थनात वॉलमार्टने ही घोषणा केली.
हे लक्ष्य साध्य करण्यासाठी वॉलमार्ट भारतीय बाजारातून उत्पादने खरेदी करण्याच्या कार्यक्रमांना गती देईल. संपूर्ण निर्यात लक्ष्य देशांतर्गत बाजारातूनच कंपनीला मिळते. देशांतर्गत वस्तूंच्या खरेदीचा सर्वाधिक फायदा भारतातील मध्यम उद्योग क्षेत्राला होईल. सोर्सिंगचा विस्तार कार्यक्रम अन्न, फार्मास्युटिकल्स, ग्राहक उत्पादने, आरोग्य आणि निरोगीपणा या क्षेत्रात शेकडो नवीन एमएसएमई-स्तरीय पुरवठादार जोडेल. वालमार्ट भारतातून निर्यातीला वेग देण्यासाठी देशांतर्गत पुरवठा साखळीला आणखी बळकट करेल. यासाठी, निर्यात संभाव्यतेसह नवीन व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सध्याच्या निर्यातदारांना ही चालना देईल.
वॉलमार्ट २० वर्षांहून अधिक काळ भारतीय उत्पादने खरेदी करीत आहे. वॉलमार्ट इंक चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन म्हणाले, की येत्या काही वर्षांत भारतातून आपल्या वार्षिक निर्यातीत वाढ झाल्याने मेक इन इंडिया उपक्रमाला बळकटी मिळेल.