पंढरपूर/दि.२९- सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी केंद्र सरकारने तपास सीबीआयकडे दिला मात्र इतक्या दिवसात त्यांनी काय दिवे लावले असा सवाल आज शरद पवार यांनी केला आहे. मुंबई पोलीस याचा तपास करीत होती मात्र केंद्राला ते पसंत नव्हते म्हणून त्यांनी दुसऱ्या एजन्सीला काम दिले. पण या प्रकरणात आत्महत्येचा विषय बाजूलाच राहिला असून लक्ष वळवण्यासाठी इतरचं गोष्टीचा तपास सुरु केल्याने सत्य बाहेर येईल का हाच प्रश्न निर्माण झाला आहे, असे शरद पवार म्हणाले.
आज शरद पवार हे कोरोनामुळे या जगाला निरोप दिलेले त्यांच्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आले असता बोलत होते . यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे होते . कोरोनाच्या संकटामुळे कोरोना चाचणी झालेल्या अतिशय मोजके पदाधिकारी व आमदार यांना या दौऱ्यात प्रवेश देण्याची खबरदारी प्रशासनाने घेतली होती. आज दुपारी बारा वाजता पहिल्यांदा पवार हे भोसे येथील राष्ट्रवादीचे दिवंगत तरुण नेते राजूबापू पाटील यांच्या निवासस्थानी पोहचले. तेथून वारकरी संप्रदायाचे जेष्ठ संत रामदास महाराज कैकाडी यांच्या मठात जाऊन त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली . एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि 25 वर्षे आमदार असलेले दिवंगत नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी प्रशांत परिचारक व कुटुंबीयांची भेट घेतली. या सांत्वनपर भेटी उरकल्यावर भोजनासाठी पवार राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी पोचले . येथेही केवळ मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला होता.
यावेळी भालके यांच्या निवासस्थानी पवार यांनी माध्यमांशी दिलखुलास गप्पा मारल्या . सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण प्रकरणात चर्चेत असलेले दोन्ही छत्रपती हे भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर आले आहेत. सध्या केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी त्यांच्याकडून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असा टोलाही खासदार छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रस्तावाबात बोलताना पवार म्हणाले, आठवले यांचा एकही आमदार अथवा खासदार नसून त्यांच्या बोलण्याला केंद्रात आणि राज्यात कोणीच गांभीर्याने घेत नाही. कृषी विधेयकाबाबत देशातील काही पक्ष न्यायालयीन लढाई लढायच्या तयारीत असताना आपल्याला हा प्रश्न घेऊन जनतेच्या न्यायालयात जावे असे वाटत असल्याचे पवार यांनी सांगितले. एका बाजूला हमीभावासाठी कायदा करायचा आणि दुसऱ्या बाजूला कांडा निर्यातीवर बंदी घालायची अशी दुटप्पी भूमिका केंद्र सरकारची असून या संपूर्ण लढ्याचे नेतृत्व शेतकऱ्यांच्या हातात देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
संजय राऊत आणि फडणवीस भेटीबाबत बोलताना ही भेट राजकीय नव्हती आणि माझी मुलाखत घेतल्यानंतरच त्यांनी मुख्यमंत्री व भाजप नेत्यांची मुलाखत घेण्याचे जाहीर केल्याचे सांगत राऊत यांची पाठराखण केली. राज्यातील सरकार स्थिर असून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल असेही पवार यांनी सांगत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. मुंबईला वीज पुरवठा करणारी खाजगी कंपनी असून जवळपास साडेतीन हजार ग्राहकांना बिले गेली नव्हती मात्र माध्यमांना फक्त मंत्रीच दिसले असे सांगत माध्यमांनाही लक्ष केले. गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे जनता अडचणीत असून ऑकटोबर मध्ये मुख्यमंत्री अजून शिथिलता देतील असे सांगताना काही शिष्टमंडळे सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत असून पुढील आठवड्यात हॉटेल वगैरेंना यात दिलासा मिळेल असे संकेतही पवार यांनी दिले.