मराठी

यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वितरण

ऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य ठेवावे-जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 27 : कोरोना संकटकाळात  ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा इच्छूकांना रोजगार मिळवून देण्यासाठी लाभ होत आहे. याद्वारे जिल्ह्यात 232 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे. यापुढेही या मेळाव्यांत सातत्य राखण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक, तसेच यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्राचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक प्रफुल्ल शेळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. डी. वाडेकर, महिला व बालविकास विभागाचे अतुल भडांगे, नायब तहसीलदार एस. पी. थोटे, कृषी अधिकारी ना. स. धनवटे, व्ही. डब्ल्यू. भोयर, महापालिकेचे एस. बी. पाटील, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघाचे अध्यक्ष अनिल वरघट आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. नवाल म्हणाले की, कोरोना संकटकाळात पात्र उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत सातत्याने ऑनलाईन मेळावे घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात 232 उमेदवारांची प्राथमिक निवड त्याद्वारे झाली. पात्र उमेदवारांना रोजगार व उद्योग-व्यवसायांना सक्षम मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. त्यात यापुढेही सातत्य ठेवावे.

पदवीधर अंशकालीन उमेदवारांना बाह्य यंत्रणेद्वारे विविध शासकीय कार्यालयात काम करार तत्वावर नेमणूका देण्याचा शासन निर्णय आहे. त्यानुसार जिल्ह्यात निवड प्रक्रिया होऊन 30 अंशकालीन उमेदवार विविध कार्यालयात रूजू झाले आहेत. इच्छूकांना उपलब्ध संधींची सतत माहिती देणे, त्यांना रोजगार मिळण्यासाठी समन्वय ठेवणे व कुशल मनुष्यबळासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे या कामांत सातत्य ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.

निवड झालेल्या उमेदवारांना यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Related Articles

Back to top button