अमरावती/दि.१२ – श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये नियमित सरावाकरिता येणारी खेळाडू वेदांती दिवाकर डांगे हिने १० नोव्हेंबर रोजी बाकू (अजरबियान) येथे आयोजित करण्यात आलेल्या ४ थ्या रिद्मिक जिम्नॅस्टिक्स ऑनलाईन ओपन चॅम्पीयनशिप आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन रिद्मिक जिम्नॅस्टिक्स रोप अॅपरेट्स, बॉल अॅपरेटस, कल्ब अॅपरेट्स या तिन्ही अॅपरेटर्समध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करून यश संपादन केले.
सदर स्पर्धेमध्ये अजरबियान, रशिया, भारत, आदी देशांच्या खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धेकरिता ऑनलाईन व्हिडीओ मंडळाच्या जिम्नॅस्टिक्स हॉलमधून सादर करण्यात आला व उत्कृष्ट सादरीकरण करून तिने यश संपादन केले. तिने या अगोदर विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन यशस्वी कामगिरी केली आहे. तसेच सलग दोन वर्षे खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय अॅरोबिक्स फिटनेस स्पर्धेमध्ये सुध्दा तिने सुवर्ण पदक पटकाविले आहे.
तिच्या या यशस्वी कामगिरीबद्दल तिला जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक प्रा. आशीष हटेकर, प्रा. एकता पाध्ये, प्रा. संजय हिरोडे, प्रा. नंदकिशोर चव्हाण, एन.आय.एस. प्रशिक्षक सचिन कोठारे, एन.आय.एस. प्रशिक्षक अक्षय अवघाते यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या सचिव व ह.व्या.प्र.मंडळाच्या सचिव तथा महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या उपाध्यक्षा डॉ. माधुरी चेंडके, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र खांडेकर, संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. विकास कोळेश्वर, कोषाध्यक्ष प्रा. राजेश पांडे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, कोषाध्यक्ष डॉ. सु. ह. देशपांडे यांनीसुद्धा तिच्या यशस्वी कामगिरीबद्दल अभिनंदन केले.