नवी दिल्ली/दि. ९ – केंद्र सरकारने(CENTRAL GOVERMENT) भारतात सात ‘हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स‘(HIGHSPEED RAILWAY CORRIDORS) बांधण्याच्या योजनेवर काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या कॉरिडॉर्सच्या निमित्ताने देशात आधुनिक तंत्रज्ञान येईल तसेच अर्थचक्राला चालना मिळेल. योजनेचा पहिला टप्पा म्हणून सात ‘हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स‘च्या तपशीलवार प्रकल्प अहवालाच्या निर्मितीसाठी डेटा गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने कॉरिडॉर्सच्या निर्मितीसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याची जबाबदारी ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड‘ म्हणजेच ‘एनएचएसआरसीएल‘ कडे सोपवली आहे. ‘एनएचएसआरसीएल‘ ज्या कॉरिडॉर्सचे डीपीआर तयार करत आहे, त्यापैकी दोन कॉरिडॉर्स मुंबईतून सुरू होणार आहेत. यातील मुंबई-नाशिक-नागपूर कॉरिडॉर हा राज्यासाठी आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक लाभाचा ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई-नागपूर व्यतिरिक्त मुंबई-हैद्राबाद हा आणखी एक कॉरिडॉर मुंबईतून सुरू होणार आहे. मुंबई-नाशिक-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी डीपीआर करण्याचे कंत्राट काढण्यात आले आहे, निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. डीपीआर करून प्रस्तावित मार्गाचे सर्वेक्षण, मार्गादरम्यान असलेल्या ओव्हरहेड, ओव्हरग्राऊंड, अंडरग्राऊंड युटिलिटीज आणि प्रस्तावित मार्गावर वीज उपकेंद्रे उभारण्यासाठी योग्य जागांच्या पर्यायांची चाचपणी ही कामे केली जातील. दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद आणि दिल्ली-लखनऊ-वाराणसी या दोन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्सच्या ‘डीपीआर‘ तयारीसाठी याआधीच कंत्राट काढण्यात आले आहे. हायस्पीड रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ वाचेल. अवघ्या काही तासांमध्ये लांबचा प्रवास करता येईल. व्यावसायिकदृष्ट्या हायस्पीड रेल्वे नागरिकांसाठी लाभदायी ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्स‘ व्यतिरिक्त मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. कोरोना संकटामुळे टाळेबंदीच्या काळात या कामाच्या गतीवर परिणाम झाला होता. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर पुन्हा काम सुरू झाले आहे. बुलेट ट्रेन, हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून प्रवास वेगवान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात बुलेट ट्रेन, हायस्पीड रेल्वे या प्रकल्पांमुळे आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी हे प्रकल्प सहाय्यक ठरतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर
१. मुंबई-नागपूर (७५३ किमी)
२. मुंबई-हैदराबाद (७११ किमी)
३. दिल्ली-अहमदाबाद (८८६ किमी)
४. दिल्ली-वाराणसी (८६५ किमी)
५. दिल्ली-अमृतसर (४५९ किमी)
६. वाराणसी-हावडा (७६० किमी)
७. चेन्नई-म्हैसूर (४३५ किमी)