रोहित शर्माचा प्रहार
पण मुंबई इंडियन्सला नाही जाता आले दोनशे पार

अबुधाबी/दि.२३-गतविजेता मुंबई इंडियन्स हा Indian Premier League ( IPL 2020) च्या जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. सीएसके विरुद्धचा पराभव विसरून मुंबई इंडियन्सने आज जी फटकेबाजी केली ती लाजवाब होती. रोहित शर्माने तर कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांना हतबल केले. घरी बसून त्याच्या फकेबाजीचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येक चाहत्याला आपण स्टेडियममध्ये का नाही याची खंत नक्कीच वाटली असेल. रोहित- सूर्यकुमार यांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने मोठी धावसंख्या उभारता आली असती, परंतु अखेरच्या षटकात विकेट गमावल्यानं MI ला दोनशेपार जाता आले नाही. केकेआर नेे नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मात्र आधीच्या चार सामन्यांपैकी तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच जिंकला आहे. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी 150 क्रमांकाची जर्सी देण्यात आली. मुंबई इंडियन्सकडून 150वा आयपीएल सामना खेळणारा पोलार्ड हा पहिलाच खेळाडू आहे.
मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी कॉक ( 1) धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी डावाला आकार दिला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहितनं मारलेला षटकार लाजवाब होता. IPL 2020 मधील सर्वात महागडा गोलंदाज पॅट कमिन्सच्या षटकात रोहितनं दोन खणखणीत सिक्स मारले. रोहित-सुर्यानं अर्धशतकी भागीदारी करताना संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 59 धावा करून दिल्या.
11व्या षटकात रोहित-सुर्या यांची 90 धावांची भागीदारी तुटली. सुर्यकुमार यादव 47 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रोहितनं सूत्र हाती घेताना 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. यादव बाद झाल्यानंतर आलेल्या सौरभ तिवारीनंही तिसऱ्या विकेटसाठी रोहितसह 49 धावा जोडल्या. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर तो ( 21) झेलबाद होऊन माघारी परतला. मुंबई इंडियन्सनं 16 षटकात 150 धावा पूर्ण केल्या.





