‘प्लाझ्मा थेरपी‘ बंदचा विचार
लस येईपर्यंत कोरोनाशी युद्ध सुरू ठेवण्याचा मोदींचा निर्धार

नवी दिल्ली/दि.२१ – ‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च‘ने प्लाझ्मा थेरपीबाबत मोठे सूतोवाच केले आहे. ‘नॅशनल हेल्थ क्लिनिकल प्रोटोकॉल‘मधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्याचा विचार करत आहोत, असे ‘आयसीएमआर‘ने म्हटले आहे. कोरोनाने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी फार प्रभावी नाही, असे अनेक संशोधनापूर्वीच म्हटले गेले आहे, असे ‘आयसीएमआर‘ने पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, लस येत नाही, तोपर्यंत आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ‘आयसीएमआर‘ने यापूर्वी ब-याच वेळा प्लाझ्मा थेरपीवर प्रश्न उपस्थित केले होते. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपीऐवजी अँटीसेरा हा पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. कोरोनावरील उपचारासाठी प्राण्यांच्या रक्ताच्या सीरमचा वापर करून अत्यंत शुद्ध अँटीसेरा विकसित केल्याचा दावा ‘आयसीएमआर‘ने केला आहे. अँटीसेरा हे प्राण्यांच्याच्या रक्तातून मिळालेले सीरम आहे. यामध्ये विषाणूंविरोधात लढण्यासा खास प्रतिपिंडे (ANTIBODY) असतात. विशिष्ट रोगांच्या उपचारांमध्ये त्यांचा उपयोग होत आला आहे, असे ‘आयसीएमआर‘चे शास्त्रज्ञ डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले. कोरोना संकटाच्या वेळी प्लाझ्मा थेरपी चर्चेत आली. कोरोनातून बèया झालेल्या रूग्णाच्या शरीरातून घेतलेला प्लाझ्मा करोनाच्या संसर्ग असलेल्या रुग्णाच्या शरीरात सोडला जातो.
त्यामुळे रुग्णांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार होते. कोरोना विषाणूचा उपचार करण्यासाठी जगातील इतर अनेक देशांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिका, स्पेन, दक्षिण कोरिया, इटली, तुर्कस्तान आणि चीनसह अनेक देशांमध्ये याचा वापर केला जात आहे. दरम्यान, कोरोनाची लस जेव्हा कधी येईल, तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल, यासाठीही सरकारची तयारी सुरू आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. करोनाविरोधातली लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केलं. आ मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी कोणीही निष्काळजीपणा केला, तर त्यामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू शकते. सावधगिरी बाळगून सगळे व्यवहार करा, असा सल्ला दिला. कोरोनाच्या संकटाशी आपण चांगली लढाई दिली आहे. सणावारांचे दिवस आहेत, बाजारात काहीशी चमक दिसू लागली आहे; मात्र टाळेबंदी संपली असली, तरीही कोरोना विषाणू गेलेला नाही हे विसरु नका, याची आठवण करून दिली. भारताने आपली स्थिती सावरली आहे ती आपल्याला आणखी उंचवायची आहे. आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत, असे ते म्हणाले.
चाचण्यांची संख्या दहा कोटींहून अधिक
भारतापेक्षा अमेरिका आणि ब्राझिल यांची स्थिती वाईट आहे. हळूहळू सगळेच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. आज आपल्या देशात कोरोना रुग्णांनासाठी ९० लाखांपेक्षा जास्त बेडस् उपलब्ध आहेत. १२ हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. देशातल्या चाचण्यांची संख्या १० कोटींचा टप्पा ओलांडेल. कोरोनाविरोधात लढताना जास्तीत जास्त चाचण्या करणे ही आपली ताकद आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली.
आनंदातही नियम
पाळा लोक निष्काळजीपणा करत आहेत. मुखपट्टी लावत नाहीत. कोरोनाबाबत जे काही नियम घालून दिले आहेत, ते पाळत नाहीत. एक लक्षात ठेवा, तुम्ही केलेली एक चूक ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरू शकते. सगळे आनंद साजरे करा. जबाबदारी म्हणून घराबाहेर पडा; पण कोरोना रोखण्यासाठी जे नियम पाळणे आवश्यक आहेत ते पाळले गेलेच पाहिजेत. कारण अद्याप कोरोनाविरोधातील लढाई संपलेली नाही. जनता संचारबंदीचा दिवस ते आजपर्यंत आपण ज्या नेटाने आणि धीराने लढा दिला, तसाच लढा आपल्याला यापुढेही द्यायचा आहे असे पंतप्रधान यांनी सांगितले.





