वाघ वगळता इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी यंत्रणाच नाही
नागपूर/दि.३- व्याघ्र संवर्धनात भारताने मोठी कामगिरी बजावली ही अभिमानाची बाब आहे. वाघांची संख्या कमालीची वाढली असून त्याचे आकडेही जारी झाले आहेत पण व्याघ्र संवर्धन करताना इतर प्राण्यांच्या संवर्धनाकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. अन्नसाखळीचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या या प्राण्यांची कधी गणनाच होत नाही. त्यामुळे राज्यात हरीण, अस्वल, कोल्हे, लांडगे किती, या प्रश्नाचे उत्तर वनविभाग आणि कोणत्याही यंत्रणेकडे नाही.
निसर्गाचा प्रत्येक घटक हा अन्नसाखळीत आणि जैवविविधतेत अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून त्यांच्या अस्तित्वाची नोंद घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे, तरच त्यांच्या संवर्धनाबाबत दिशा ठरविता येईल. रुबाबदार वाघ दुर्मिळ होत चालल्यानंतर यंत्रणेला जाग आली आणि त्याच्या संवर्धनाच्या हालचाली सुरू झाल्या. अशाप्रकारे अनेक प्राण्यांचे अस्तित्व लोप पावत आहे आणि त्याकडे कुणाचे गांभीर्याने लक्षही गेले नाही. म्हणूनच 1998 मध्ये 45 हजारांवर असलेली बिबट्यांची संख्या 7 हजारांवर खाली आली. त्यामुळे आता राज्य शासनाने त्यांच्या संवर्धनाबाबत पुढाकार घेतला आहे.
वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांच्या मते, पूर्वी गावस्तरावर लोकांच्या ओळखीचे वाटणारे चौसिंगा, सांभार, कोल्हे, लांडगे, खोकड, खवले मांजर, रानमांजर, अस्वल, तडस, मसन्या उद, चांदी अस्वल, भेडकी या प्राण्यांचे अस्तित्व आता नाहीसे होताना दिसत आहे. यातील लांडगे, कोल्हे व खवले मांजर यांचे अस्तित्व धोकादायक स्थितीत पोहचले आहे. पेंच अभयारण्यात नीलगाय, सांभार किंवा नवेगाव नागझिरामध्ये रानकुत्र्यांबाबत अंदाजे सांगण्यात येते, मात्र त्यांचीही ठोस गणना न झाल्याचे वनविभागाचे अधिकारी मान्य करतात. वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांनीही वाघ वगळता इतर प्राण्यांची गांभीर्याने गणना होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.