यवतमाल

बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

यवतमाळ, दि.2 : नागरिकांनी चाईल्ड लाईनला माहिती दिल्याने यवतमाळच्या लोहारा परिसरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे.यवतमाळ शहरालगत लोहारा परिसरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती येथील व्यक्तीसोबत ठरला होता. हा विवाह खटेश्वर येथील समाजमंदिरात 30 ऑगस्टला आप्तेष्ठाच्या उपस्थितीत होणार होता. या विवाहाची  गोपनीय तक्रार 1098 या चाईल्ड लाईनच्या मदत कक्षाला प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन टिम व यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मदतीने मुलीच्या पालकांची भेट घेऊन मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21  पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दखलपात्र गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली. त्यामुळे पालकांनी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच तिचे लग्न करण्याबाबत लेखी जवाब दिला व मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लग्न न करण्याचे ठरविले.

सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चना इंगोले व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आकाश बुरेवार, सुनील बोक्से, चाईल्ड लाईनचे समन्वयक योगेश मेश्राम, दिलीप दाभाडेकर, विद्या पेंदोर, वैष्णवी चिंतावार, यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, पोलीस कर्मचारी संजय भुजाडे, प्रेमसिंग राठोड, अशोक शंकर आंबिलकर यांच्या उपस्थित पार पडली.

बाल विवाहाची माहिती असल्यास नागरिकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ येथे अथवा चाईल्ड लाइन 1098 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेन्द्र राजुरकर यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button