लॅब चाचण्यामध्ये यवतमाळ द्वितीय क्रमांकावर
जिल्ह्यातील 22 हजारांच्यावर नागरिकांच्या नमुन्यांची तपासणी
यवतमाळ, दि. 2 : कोरोनाच्या संकटात नागरिकांना असलेली लक्षणे आणि त्याची त्वरीत चाचणी होणे अत्यंत आवश्यक आहे. लवकर निदान झाले तर उपचारासाठी वेळ मिळतो व त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविण्यास मदत होते. त्यामुळेच जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यांनी भर दिला असून जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्याचीच फलश्रृती म्हणजे प्रत्येक दिवशी लॅबमध्ये होणा-या चाचण्यांच्या संख्येत यवतमाळ द्वितीय क्रमांकावर आहे.
12 मार्च पासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला. सुरवातीला येथील रुग्णांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते. जसजशी रुग्णांची संख्या वाढत गेली. तसे नमुन्यांची संख्यासुध्दा वाढली. त्यामुळे नागपूरवरून रिपोर्ट प्राप्त होण्यास बराच कालावधी लागत होता. या दरम्यान पॉझेटिव्ह असलेला व्यक्ती इतरांच्या संपर्कात येत असल्यामुळे रुग्णांची संख्या न कळत झपाट्याने वाढत होती. मात्र रिपोर्ट येईपर्यंत संबंधित पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील अतिजोखीम व कमीजोखीम व्यक्तींचे नमुने घेण्यास प्रशासनाची अडचण जात होती. या सर्व अडचणी लक्षात घेऊन पालकमंत्री यांच्या पुढाकाराने व प्रशासनाच्या नियमित पाठपुराव्यामुळे यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 3.50 कोटी रुपये खर्च करून विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरू करण्यात आली. त्यामुळे यवतमाळ येथील रुग्णांचे व त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या नमुन्यांची चाचणी अहोरात्र येथे सुरु आहे. याशिवाय बुलडाणा व वाशिम येथील रुग्णांचेसुध्दा नमुने यवतमाळच्या प्रयोगशाळेत तपासणी होत आहे.
पहिल्या दिवसांपासून आतापर्यंत यवतमाळ येथील प्रयोगशाळेत एकूण 50262 नमुने पाठविले असून यापैकी 30438 नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. उर्वरीत 19824 रॅपीड ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे नमुने तपासण्यात आले आहेत. 31 ऑगस्टपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील 22624 नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक यवतमाळ तालुका (2655 नमुने) असून, एक हजारांपेक्षा जास्त नमुने पांढरकवडा तालुका (2264 नमुने), पुसद तालुका (2036 नमुने), दिग्रस तालुका (1946 नमुने), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (1673 नमुने), घाटंजी तालुका (1463 नमुने), राळेगाव तालुका (1432 नमुने), वणी तालुका (1295 नमुने), उमरखेड तालुका (1170 नमुने), महागाव तालुका (1106 नमुने), कळंब तालुका (1102 नमुने), बाभुळगाव तालुका (1060 नमुने) आहे.
एका दिवसात तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या 21 ऑगस्ट रोजी 616 नमुने, 22 ऑगस्ट रोजी 726 नमुने, 23 ऑगस्ट 461 नमुने, 24 ऑगस्ट 558 नमुने, 25 ऑगस्ट 612 नमुने, 26 ऑगस्ट 687 नमुने, 27 ऑगस्ट 560 नमुने, 28 ऑगस्ट 752 नमुने, 29 ऑगस्ट 795 नमुने, 30 ऑगस्ट 656 नमुने आणि 31 ऑगस्ट रोजी 853 नमुने आहेत.
नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्याने जास्तीत जास्त नमुने पाठवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला दिले आहे.