अमरावतीमराठी

नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत क्षेत्रातील भौतिक सुविधांकडे लक्ष पुरवा -जिल्हाधिकारी पवनीत कौर

जिल्हा उद्योग मित्र समिती सभेची आढावा बैठक

अमरावती/दि.22 : औद्योगिक वसाहत क्षेत्रातील भौतिक सुविधांकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. महानगरपालिकेमार्फत उद्योग क्षेत्रातील ओला कचरा, सुका कचरा यांची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच या क्षेत्रामध्ये सायंकाळी असामाजिक तत्त्वे असलेल्या नागरिकांचा वावर वाढतो. येथील गुन्हेगारीवर वचक बसण्यासाठी पोलीस विभागामार्फत सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष संरक्षण व्यवस्था पुरविण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे जिल्हा उद्योग मित्र समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती जिल्हा उद्योग क्षेत्राचे प्रभारी व्यवस्थापक गिरीश सांगळे, नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत क्षेत्राचे अध्यक्ष ब्रजेशकुमार श्रीवास्तव, अमरावती औद्योगिक वसाहत क्षेत्राचे सचिव किरण पातूरकर, सातुर्णा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र लढ्ढा, अमरावती विभागीय औद्योगिक संघटनेचे सचिव सुरेंद्र देशमुख तसेच मनपा उपआयुक्त प्रविण आष्टीकर, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे आदी यावेळी उपस्थित होते.

नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत क्षेत्र तसेच सातुर्णा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थाच्या परिसरातील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तसेच औद्योगिक वसाहत क्षेत्रात उद्योगांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तसेच अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो पुर्वरत सुरु करण्यासाठी स्वतंत्र लाईनमनची नियुक्ती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत करण्यात यावी. कमगारांना अपघातामुळे अपंगत्व आल्यास अपंगत्व प्रमाणपत्रासाठी नागपूरला जावे लागते. यामुळे कामगारांना आर्थिक भुर्दंड पडतो. ही बाब विचारात घेऊन कर्मचारी राज्य विमा योजनामार्फत कामगारांच्या बिलाची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. त्याचप्रमाणे आठवड्यातील दोन दिवस राज्य विमा कर्मचाऱ्यांच्या पथकाने अमरावती शहरात सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या. सद्यस्थितीनुसार 466 विमाधारकांचे 99.21 लक्ष रुपयांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी एकूण 334 विमाधारकांना 78.20 लक्ष रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती विमा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

सातुर्णा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावे. तसेच नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत क्षेत्रात फायरस्टेशनची सुविधा पुरविण्यात यावी. या भागातील बंद पथदिवे सुरु करण्यात यावे, अशी मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत तक्रार आल्यास त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी यावेळी सांगितले. औद्यागिक वसाहत क्षेत्र ते बडनेरा रोड हा गोपाल नगरमधून जाणाऱ्या रस्त्याचा उद्योजक, कामगार व स्थानिक नागरिक वापर करतात. या रस्त्याची त्वरित सुधारणा करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

औद्योगिक संघटनेच्या अधिनस्त औद्योगिक उपक्रमांमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच अनुकंपाधारकांना शैक्षणिक पात्रता तसेच जागेच्या उपलब्धतेनुसार रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Back to top button