कोटा/दि. १६ – जिल्ह्यातील इटावाजवळ असलेल्या चंबळ नदीत बोट पलटी झाल्याने 11 जणांचा मृत्यू झाला. सर्वांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून, तीन जण बेपत्ता आहेत. अपघात बुधवारी सकाळी नऊ वाजता झाला. मृतांमध्ये सहा पुरुष, चार महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. बोट चालवणारा पोहून नदीबाहेर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, बोट फक्त 25 जणांचा भार पेलू शकत होती; पण त्यात 40 जण बसले होते. तसेच 14 मोटारसायकलीही तिच्यात ठेवल्या होत्या. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणी नदीची खोली 40-50 फूट आहे. घटनेनंतर स्थानिकांनी बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या; पण नदीचा प्रवाह वेगवान असल्यामुळे अनेकांना वाचवता आले नाही. पोलिसांनी सांगितले, की हे सर्वजण कमलेश्वर धामला जात होते. मृत्यू झालेले सर्व गोठडा कलाचे रहिवासी होती. अपघात चाणदा आणि गोठडा गावादरम्यान झाला. घटनास्थळी गावातील लोक असल्यामुळे बचाव कार्यात मदत मिळाली. लोकांनी सांगितले, की या लाकडी बोटीची स्थिती आधीपासूनच खराब होती. तरीदेखील क्षमतेपेक्षा जास्त लोकांना त्यात बसवण्यात आले आणि मोटारसायकलही ठेवण्यात आल्या. त्यामुळे बोट वजन पेलू शकली नाही आणि नदीत बुडाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. लोकसभा सचिवालयाने जिल्हा प्रशासनोसोबत संपर्क साधला असून कोटा येथून एसडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. बचावकार्य सुरू आहे.