मराठी

सुकामेव्याचा केक बनविण्याची १३७ वर्षांची परंपरा

तिरुअनंतपूरम दि २४- जगभर उद्या ख्रिसमस साजरा होत आहे. या दिवशी सुकामेवा व मसाल्यांचा सुगंध असलेला प्लम (आलूबुखारा) केक खाण्याची परंपरा आहे. हा केक मुळात युरोपातील. भारतात पहिल्यांदा १८८३ मध्ये केरळमधील थालास्सेरी येथे तयार झाला. ब्रह्मदेशातून (आता म्यानमार) आलेले व्यापारी ममबल्ली राजू यांनी दालचिनी पिकवणारे ब्रिटिश शेतकरी मर्डोक ब्राऊन यांच्या सल्ल्यानुसार हा केक बनवला. राजू यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून हा केक बनवत आहे. ही परंरा त्यांनी जपली आहे.
राजू यांचे नातू व ममबल्ली बेकरीचे मालक प्रकाश सांगतात, की आजोबा ब्रिटिश सैनिकांसाठी दूध, चहा, ब्रेड ब्रह्मदेशातून इजिप्तला पाठवायचे. ते १८८० मध्ये थालास्सेरीला परतले व रॉयल बिस्किट फॅक्टरी बेकरी सुरू केली. त्या काळी इंग्रजांची गरज कोलकात्यातील एकमेव बेकरी भागवायची. यामुळे आजोबांचा कारखाना भारतीयाने स्थापन केलेली पहिली बेकरी होती. प्रकाश आता १७ प्रकारचे प्लम केक बनवतात, तेही देशी चवीसह. ते सांगतात, की ब्रह्मदेशात आजोबा बिस्कीट तयार करण्यात तरबेज झाले. ते ४० प्रकारची बिस्किटे, ब्रेड बनवू लागले. १८८३ चा ख्रिसमस येणार होता. आजोबांजवळ मर्डोक आले व इंग्लंडमधील प्लम केक दाखवून म्हणाले, की असाच केक बनवा. मर्डोक यांनी साहित्य देऊन फ्रेंच ब्रँडी टाकायला सांगितले. आजोबांनी त्याऐवजी कोको, मनुका व सुकामेवा टाकला. मर्डोक यांनी भारतात तयार झालेला पहिला प्लम केक खाल्ला व खूश झाले.
राजू यांचे नातेवाइक तिरुवनंतपूरममध्ये बेकरी चालवणारे प्रेमनाथ सांगतात,  की त्या काळी यिस्ट मिळायचे नाही, म्हणून दारू टाकली जायची. आजही केक जुन्या पद्धतीने बनवला जातो. फक्त दारू ऐवजी यिस्टचा वापर करतात. भारतात केरळ प्लम केकची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ममबल्ली कुटुंबच केरळमधील सर्वांत मोठी बेकरी सांभाळते. कोचीन बेकरी (कोची), सांता बेकरी (तिरुवनंतपूरम), थालास्सेरीतील ममबल्ली बेकरीसारख्या अनेक बेकऱ्या या कुटुंबांच्याच आहेत. प्रत्येक बेकरीत मर्डोक ब्राऊन यांना राजू यांनी दिलेल्या पहिल्या केकचे चित्र आजही ग्राहकांचे स्वागत करते.

Related Articles

Back to top button