15 वर्षीय अपहरणकरून हत्त्या
वाशीम १४ सप्टेंबर – 19 जानेवारी 2020 रोजी वाढदिवसाला गेलेल्या व बेपत्ता झालेल्या वैष्णवी जाधव हिच्या बेपत्ता प्रकरणाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले असून, नातेवाईकांनी वैष्णवीचे अपहरण करुन तिचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे गत आठ महिन्यापासून गाजत असलेल्या वैष्णवी जाधव बेपत्ता प्रकरणा अखेर पडदा पडला.
अधिक माहिती देतांना जिपोअ परदेशी यांनी सांगीतले की, सातत्याने मिळालेली अपमानास्पद वागणूक, शाळा निर्मितीसाठी पैसे मिळावे या दोन प्रमुख कारणावरुन आठ महिन्यापासून बेपत्ता असलेल्या वैष्णवी जाधव या 15 वर्षीय मुलीचा खून तिच्याच नातेवाईकांनी करुन तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. वैष्णवी जाधव ही 15 वर्षीय मुलगी इयत्ता 9 वी मध्ये हॅपी फेसेस शाळेत शिकत होती. 19 जानेवारी रोजी तिचे आजी व आजोबा घरी असतांना मैत्रिणींनी तिला घरुन वाढदिवसाला घेऊन जातो म्हणून नेले होते. वैष्णवीचे वडील विजय जाधव हे किडनी प्रत्यारोपणसाठी गुजरात येथे गेले होते. वाढदिवसाचे निमीत्य करुन गेलेली वैष्णवी त्यानंतर घरी परतलीच नाही. वैष्णवी जाधव हिचा तपास लागावा म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी पवन बनसोड यांनी वेगवेगळ्या स्वरुपाची तीन पथके करुन महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर तपास केला. वैष्णवी जाधव हिचा मोबाईल वांगी ते रिठद दरम्यान स्वीच ऑफ झाला होता. त्याचवेळेस गोपनीय माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फूटेजमुळे वैष्णवी जाधव यांच्या नात्यातील माधुरी बद्रीनारायण गोटे हिच्यावर तपास केंद्रीत केला. वारंवार चौकशी व शेवटी पोलिस खाक्या दाखवताच माधुरी बद्रीनारायण गोटे हिने आपण आपल्या पतीच्या मदतीने वैष्णवीचा खून केल्याचे कबुल केले.वैष्णवीला कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला माधुरी गोटे व बद्रीनारायण गोटे यांनी वांगी ते रिधोरा रोडवर असलेल्या हनुमान मंदीराजवळ चारचाकी वाहनाने नेऊन गळा दाबून जीवे मारले व नंतर जाळून टाकल्यानंतर दुसर्?या दिवशी सकाळी पुरावे नष्ट करण्याच्या द़ृष्टीने कार्य केले. माधुरी गोटे हिने दाखविलेल्या ठिकाणावर पोलिसांनी पीडित मुलीच्या हाडाचे अवशेष पंचासमक्ष ताब्यात घेतले. सुरुवातीला वाशीम पोलिसांनी वैष्णवी जाधव प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दोघांनी कबुली जबाब दिल्यानंतर त्यांच्यावर अपहरणासह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वैष्णवी जाधव याचा तपास लागावा म्हणून आमदार अमीत झनक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत असतांनाच यासंदर्भात विधानसभेत तारांकीत प्रश्न ही उपस्थित केला होता. या प्रकरणातील बद्रीनारायण गोटे हा सेट नेट उत्तीर्ण असून, अमरावती येथे कोचिंग क्लासेस चालवत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक परदेशी यांनी दिली. त्याला स्वत:ची शाळा स्थापन करायची होती त्यासाठी वैष्णवी जाधव हिच्या वडिलाकडून त्यांना रक्कम अपेक्षित होती. हेच कारण तिच्या खूनाला मुख्यत: कारणीभूत ठरले. वैष्णवी जाधव बेपत्ता व खून प्रकरणी तपास करणारे तपास अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक डॉ पवन बनसोड, स्थागुशा चे पोनि शिवाजी ठाकरे, सहायक पोनि मोहनकर , वाढवे, बन्साळे व त्यांच्या पथकाला तपास लावल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी परदेशी यांनी 10 हजाराचे बक्षीस दिले.