मराठी

१५ हजार टन कांदे आयात करणार

वीस तारखेपर्यंत कांदा भारतात

मुंबई/दि.३१ – कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि महागाई रोखण्यासाठी नाफेडने 15 हजार टन लाल कांद्याची आयात करण्यासाठी निविदा काढल्या. निविदेच्या अटीनुसार आयातदारांना लाल कांदे 50 रुपये प्रतिकिलो दराने पुरवठा करावा लागणार आहे. हा कांदा कोणत्याही देशाचा असू शकतो आणि 20 नोव्हेंबरपर्यंत त्याचा पुरवठा करावा लागेल.
आयातदारांना किमान एक हजार टन कांद्याचा पुरवठा करावा लागेल. निविदा प्रक्रिया 4 नोव्हेंबर रोजी बंद होईल आणि त्याच दिवशी निविदा उघडण्यात येतील. जवाहरलाल नेहरू बंदर आणि कांडला बंदरात कांदा उतरविण्यात येणार आहे. नाफेडचे एमडी एस. के. सिंह म्हणाले, की १५ हजार टन कांदा आयात केल्यामुळे बाजारात पुरेसा कांदा येईल आणि भावही स्थिर राहतील. बोलीचे मूल्य, गुणवत्ता व लवकरात लवकर पुरवठा या आधारे आयातीच्या निविदा मंजूर केल्या जातील. गेल्या वर्षी नाफेडने मोठ्या आकाराच्या कांद्याची आयात केली; परंतु हा कांदा देशांतर्गत बाजारात खपला नाही.
सरकारच्या आदेशानुसार नाफेड कांद्याचा साठा राखीव करते; परंतु आता कांद्याचा मर्यादित साठा शिल्लक आहे. बाजारातील कांद्याचा अपुरा पुरवठा लक्षात घेऊन शिल्लक असेलला साठा बाजारात आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे कांदा आयात वाढविण्यास सांगितले. गेल्या वर्षी नाफेडने स्वत: कांदा आयात केला होता, त्याचबरोबर एमएमटीसी या सरकारी कंपनीने कांदा आयात केला होता. पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने आवक कमी होऊन भाव 80 रुपयांच्या वर गेले. प्रमुख कांदा उत्पादक क्षेत्रात मुसळधार पावसामुळे खरीप पिकाचा नाश झाला आहे. हे लक्षात घेता नाफेडने विविध मंडई व किरकोळ बाजारात सुमारे एक लाख टन कांदा बाजारात आणला. शिवाय 37 हजार टनाचा राखीव साठा बाजारात आणला.

आयात आणि साठाबंदी

वाणिज्य व ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, की व्यापा-यांनी आधीच सात हजार टन कांदा आयात केला आहे आणि दिवाळीपूर्वी आणखी 25 हजार टन आयात अपेक्षित आहे. सणासुदीच्या हंगामातील भाववाढ रोखण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असून  व्यापा-यांच्या कांदा साठवणुकीवरही बंधने आणली आहे.

Back to top button