नवी दिल्ली दी.२९ – कोरोना काळात अनेक गोष्टींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यवसाय, परिवहन, रोजगार या सर्वांनाच कोरोनाचा फटका बसला आहे. दरम्यान कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे लोकं नोटा देखील सॅनिटाइझ करत आहेत. लोकांनी चलनातील नोटा सॅनिटाइझ केल्यामुळे, धुवून वाळवल्यामुळे मोठ्या संख्येने चलन खराब झाले आहे. यामुळेच आरबीआयकडे पोहोचणाऱ्या खराब नोटांनी सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. सर्वाधिक २ हजाराच्या नोटा खराब झाल्या आहेत. आरबीआयकडे यावेळी २ हजाराच्या १७ कोटीपेक्षा जास्त नोटा आल्या आहेत. याशिवाय २००, ५००, २० आणि १० च्या नोटा देखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्या आहेत.
आरबीआयच्या अहवालानुसार यावर्षी २ हजाराच्या १७ कोटींपेक्षा अधिक नोटा खराब झाल्या आहेत. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा ३०० पट अधिक आहे. कोरोनाच्या भीतीने लोकांनी नोटा सॅनिटाइझ करण्यास, त्या धुवून वाळवण्यास सुरुवात केली. काही बँकांमध्ये देखील नोटांच्या बंडलावर सॅनिटायझर स्प्रे केला जात आहे. यामुळे जुन्या नोटांबरोबरच यावर्षीच्या नव्या नोटा देखील खराब होत आहेत. गेल्यावर्षी २००० च्या ६ लाख नोटा खराब झाल्या होत्या, यावर्षी हा आकडा १७ कोटींहून अधिकआहे. ५०० च्या नोटा १० टक्क्याने अधिक खराब झाल्या आहेत. दोनशेच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० टक्के अधिक खराब झाल्या आहेत. २० च्या नोटा एका वर्षात २० टक्क्याहून अधिक खराब झाली आहे.
२०१७-१८ मध्ये आरबीआयकडे २ हजाराच्या एक लाख नोटा आल्या होत्या. २०१८-१९ मध्ये ही संख्या वाढून ६ लाख झाली होती. यावर्षी या आकडेवारीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वर्ष २०१९-२० मध्ये आरबीआयकडे २ हजाराच्या १७.६८ कोटी नोटा आल्या. याप्रमाणे ५०० च्या नोटा २०१७-१८ मध्ये १ लाख, २०१८-१९ मध्ये १.५४ कोटी तर २०१९-२० मध्ये १६.४५ कोटी इतक्या आरबीआयकडे आल्या आहेत. दरवर्षा आरबीआयकडे १०, २० आणि ५० च्या नोटा सर्वाधिक येतात.