मुंबई/दि.१– लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आयोजित केलेल्या आरोग्योत्सवात आत्तापर्यंत 246 जणांनी प्लाझ्मादान केले आहे. तर 10 हजारांहून अधिक जणांनी रक्तदान केले आहे.याचबरोबर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून कोरोना संकट काळात सेवा बजावताना मुंबई व राज्यातील शहीद झालेल्या 91 पोलिस कर्मचारी बांधवांच्या कुटुंबीयांना शौर्यचिन्ह आणि प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तर गलवान खोऱ्यात देशासाठी शहीद झालेल्या 22 जवानांच्या कुटुंबीयांना मंडळातर्फे 15 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 2 लाख रूपये देण्यात आले.
याशिवाय, 4 मे ते 4 जून या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळपास 29 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे वाटप केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.
्रदरम्यान, यंदा गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून घेण्यात आला होता.