मराठी

परिमंडलात ३ लाख ६ हजार ८९२ ग्राहकांना भरले नाही एप्रिलनंतर एकही बिल

महावितरण आर्थीक संकटात: वीजबील भरून सहकार्य करण्याचे आवाहन

अमरावती,दि १४ लॉकडाऊनमध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी व या काळात महावितरणने आपल्या ग्राहकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या १० महिन्याच्या  काळात वीज बिल भरण्याचा कुठलाच तगादा न लावता अखंडित वीज पुरवठा केला आहे.याचाच फायदा घेत अमरावती परिमंडळातील लघूदाब वर्गवारितील ३ लाख ६ हजार ८९२ ग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाही वीजबिल भरले नसल्याने वीज देयकापोटी त्यांच्याकडे २६० कोटी रूपये थकले आहे. आपल्या ग्राहकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी अखंडित वीज सेवा देणारी महावितरणच आर्थीक संकटातून जात असल्याने थकबाकीदार ग्राहकांनी  थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन अमरावती परिमंडलाच्यावतीने करण्यात येत आहे.

राज्यातील खाजगी वीज वितरण कंपन्यां थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा माहे ऑक्टोबर २०२० पासूनच खंडित करीत असून महावितरणकडून मात्र माहे फेब्रुवारी २०२१ पासून थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.याशिवाय महावितरण ही वीज ग्राहकांसारखी वीज निर्मिती कंपन्याची एक ग्राहकच असल्याने वीज बिलाच्या सुमारे ८५ टक्के खर्च हा वीज खरेदीवर होत असतो. पण मागील दहा महिन्यात वाढलेली थकबाकीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे भविष्यात महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

वीज ग्राहक हे महावितरणचे दैवत असून  ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास कटीबद्ध आहे. हेल्प डेस्कद्वारे वीज बिलांसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे, याबद्दल ग्राहकांनी समाधानही व्यक्त केलेले आहे. तेंव्हा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता परिमंडलातील थकबाकीदार ग्राहकांनी आपले वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

परिमंडलातील एप्रिल २०२० नंतर एकदाही बिल न भरणाऱ्या विविध वर्गवारीतील ग्राहकांमध्ये अमरावती जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ६२० ग्राहक असून त्यांच्याकडे १६५ कोटी व यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख १७ हजार २७२ ग्राहकांकडे ९५ कोटीचे वीज देयके थकले आहेत.

Related Articles

Back to top button