
मुंबई/दि.१९- भाईंदर पश्चिम येथील एका निवासी इमारतीच्या सदनिकेत चक्क भाजपा कार्यकर्ता हुक्का पार्लर चालवत असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे . तर भाजपा कार्यकर्ता मात्र पसार झाला आहे.
भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील श्री सिद्धार्थ सोसायटीतील (श्री पाटण जैन मंडळ) सदनिका क्रमांक 8 मध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने या सदनिकेवर धाड टाकली असता आतमध्ये कायद्याने बंदी असूनही तंबाकू मिश्रित हुक्क्याची नशा केली जात होती.
पोलिसांनी वरून सुरेश अग्रवाल ( 22) , जितू मुलचंद गुप्ता ( 31) , सलीम मेताफ शेख (24) , अक्षय निर्मल कुमार त्रिवेदी ( 23) , साहिल अखतर खान ( 19), शहाबुद्दीन उर्फ सैफ इंतादूर रहमान ( 24) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी भाईंदर भागातील राहणारे आहेत .
तर हुक्का पार्लर चालवणारा म्होरक्या करण उर्फ राजा भरत जोशी रा. त्रिवेणी अपार्टमेंट, भाईंदर हा पसार झाला आहे. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजा हा भाजपाचा कार्यकर्ता आहे. या भागातील रहिवाशी या हुक्का पार्लरमुळे त्रासले होते. पण बेकायदा हुक्का पार्लर चालवणारा भाजपा चा कार्यकर्ता असल्याने रहिवाशी घाबरून गप्प होते, असे रहिवाश्यांनी सांगितले.