मराठी

87 हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त

आयएमएच्या 500 हून अधिक डॉक्‍टरांचा मृत्यू

मुंबई/दि.४  – कोरोनाकाळात रुग्णसेवा बजावताना देशभरातील तब्बल 515 डॉक्‍टरांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यामध्ये 292 डॉक्‍टर हे महाराष्ट्रातील आहेत; तर 87 हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. यात खासगी डॉक्‍टर, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे; मात्र या सर्व कोव्हिडबाधित डॉक्‍टरांची नोंद सरकारने केलेली नाही. याशिवाय सरकारी रुग्णालयातील किती आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, याबाबतची माहिती समोर आली नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे.
कोरोना रुग्णांची सेवा करताना झालेल्या संसर्गामुळे या डॉक्‍टरांचा मृत्यू झाला असून, यातील केवळ 62 डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांनाच सरकारने जाहीर केलेल्या विम्याचा लाभ मिळाला आहे, अशी माहितीही आयएमएने दिली आहे. देशभरातील 1 हजार 746 शाखांमधून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्‍टरांचीही आकडेवारी समोर आली आहे. हे सर्व ऍलोपॅथी शाखेतील डॉक्‍टर आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्‍टरांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्‍यता आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी व्यक्त केली.

आतापर्यंत देशभरातील 87 हजार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान मोदींनी कोव्हिड योद्‌ध्यांसाठी जाहीर केलेल्या विमा योजनेचा लाभ 515 पैकी केवळ 62 डॉक्‍टरांना मिळाला आहे. अजूनही 130 विमा प्रतीक्षेत आहेत. अजूनही काही राज्यांकडून विम्यासाठीची सर्व कागदपत्रे आलेली नाहीत. केंद्र सरकारने डॉक्‍टरांच्या माहितीचा डेटाबेस तयार करायला हवा.
  – डॉ. राजन शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए

सद्यस्थितीत देशभरात 87 हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यातील 572 जणांचा मृत्यू झाला आहे. 572 मधील 50 टक्के कर्मचारी महाराष्ट्रातील आहेत; तर देशात 515 डॉक्‍टरांचा मृत्यू झाला आहे.
– डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए (महाराष्ट्र)

Related Articles

Back to top button