अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांना मोठा धक्का
वाॅशिंग्टन/दि.३१ – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प प्रशासनाने टिकटाॅकवर घातलेल्या बंदीला तेथील न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
लोकप्रिय चिनी अॅप टिकटाॅकवर बंदी घालण्याच्या निर्णयाला 12 नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेच्या न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. दोन टिकटाॅक वापरकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने गेल्या महिन्यात सांगितले होते, की अमेरिकेतील लोकांना चिनी मेसेजिंग अॅप, वुई चॅट आणि व्हिडिओ शेअर, टिकटाॅक डाउनलोड करण्यास मनाई आहे. शुक्रवारी अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश वेंडी बिस्टलस्टोन यांनी पुढील आदेश येईपर्यंत अमेरिकन वाणिज्य विभागाची कारवाई थांबविली आहे. वाणिज्य विभाग पुढील काही दिवसांत टिकटाॅकवरील बंदीसंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलणार होता.
ट्रम्प सरकारने अमेरिकेच्या सुरक्षेसाठी चिनी कंपनी बाईटडान्सचे टिकटाॅक हे एप धोकादायक असल्याचे म्हटले होते. ट्रम्प सरकारचे म्हणणे आहे, की टिकटाॅक वापरकर्त्यांच्या डाटाची हेरगिरी करते. हे लक्षात घेता ट्रम्प प्रशासनाने टिकटाॅकवर बंदी घालण्यासाठी कार्यकारी आदेश 12 नोव्हेंबरपासून लागू होणार होता; परंतु आता न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिकेत सध्या टिकटाॅकला बंदी घातली जाणार नाही. वाणिज्य अधिका-यांनी सांगितले, की ते 12 नोव्हेंबरपर्यंत टिकटाॅकचे तांत्रिक व्यवहारांवर थांबत नाहीत. अमेरिकेत टिकटाॅकचे दहा कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.