मराठी

करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबास 50 लाखांचा धनादेश

पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी केले प्रयत्न

वर्धा/दि.५ करोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन कर्तव्य पार पाडत असतांना, करोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या पोलीस हवालदार विलास बालपांडे यांच्या कुटुंबीयांना आज 50 लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला.
जिल्हा पोलीस दलातील विलास बालपांडे यांचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले होते. करोना कर्तव्य काळात बालपांडे यांना करोना विषाणूची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कर्तव्यावर असतांना मृत्यू झाल्यास वारसदारास 50 लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा शासन निर्णय आहे. शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक हातभार लावावा म्हणून करण्यात येत असलेली ही मदत तत्परतेने मिळावी, यासाठी पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाशी संपर्क साधला. एक महिन्याच्याआत सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
आज पोलीस अधिक्षक कार्यालयात शहीद हवालदार बालपांडे यांच्या पत्नी जया विलास बालपांडे यांना मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. सदर कुटुंबास भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तत्परतेने मदत करण्याची हमी पोलीस अधिक्षक होळकर यांनी यावेळी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button