मराठी

बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी

पं. दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा आजपासून प्रारंभ

अमरावती, दि. 22 : अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने 23 ते 30 सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन पध्दतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात 151 पदांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. नोकरीइच्छूक युवक- युवतींनी या ऑनलाईन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
कोरोना संकटामुळे शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या काळात काही दिवसांपासून अनेक आस्थापना, व्यवसाय, उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी शर्तींच्या अधीन राहून कंपन्या, आस्थापना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत असल्याने नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे.
मेळाव्यात धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद यांच्याकडील ट्रेनी ऑपरेटरची 50 रिक्त पदे, ईसीई (इंडिया) प्रा. लि., अमरावती यांच्याकडील मॅनेजर, मशीन ऑपरेटर, ट्रेनी इंजिनिअर, टेक्निशियन आदींची  60 रिक्तपदे, जावरकर मॅटर्निटी अँड नर्सिंग होम यांच्याकडील डिप्लोमा इन एएनएम पात्र उमेदवारांसाठी दोन रिक्त पदे, ऑर्चिड पल्स केअर हॉस्पिटल यांच्याकडील डिप्लोमा इन एएनएम किंवा डिप्लोमा इन जीएनएम पात्र उमेदवारांसाठी 10 रिक्त पदे, डफळे हॉस्पिटलमध्ये  डिप्लोमा इन एएनएम किंवा डिप्लोमा इन जीएनएम पात्र उमेदवारांसाठी चार रिक्त पदे, तसेच पुणे येथील कुशल क्रेडाई पुणे मेट्रो इनोवेटिव्ह यांच्याकडील पाचवी उत्तीर्ण ते एसएससी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 25 रिक्त पदांचा समावेश आहे.
उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी व लॉग इन करावे. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदासाठी आपला सहभाग ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा,  असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button