मराठी

एसी, कुलर, फ्रीज महागण्याची शक्यता

नवी दिल्ली/दि.८ – औद्योगिक कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत असल्याने छोटे उद्योजकांवर दबाव आला आहे. पॉलिमर, तांबे, पोलाद, पॅकेजिंग साहित्याच्या किंमती गेल्या सहा महिन्यांत वाढल्यामुळे लघु उद्योजकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे एसी, फ्रीज आणि कुलरसारख्या वस्तू महाग होऊ शकतात.
प्लॅस्टिकच्या वस्तू बनवणा-या छोट्या उद्योजकांनी सांगितले, की ते वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर कच्चे माल म्हणून वापरतात. गेल्या आठ ते 1दहा महिन्यांत त्यांच्या किमती 40 ते 155 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये झालेल्या या वाढीमुळे त्यांना उत्पादन कमी करावे लागले आहे. कच्चा माल खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे रोख रक्कम नाही. पॉलिमरच्या वाढत्या किंमतीवर बंदी घालावी, असे आवाहन अखिल भारतीय प्लॅस्टिक उत्पादक संघटनेने केले आहे. पॉलिमरच्या किंमती वाढल्यामुळे प्लॅस्टिक पाईप, पाण्याच्या टाक्या, प्लॅस्टिक बॉडी कुलर महाग होतील. छोटे उद्योजक तोट्यात जास्त काळ व्यसाय करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना किंमत वाढविणे भाग आहे. त्याचा फटका अंतिमतः ग्राहकावर पडू शकेल.
गेल्या तीन महिन्यांपासून तांब्याच्या किंमती वाढल्यामुळे वाातानुकुलित यंत्रे, फ्रिजसारख्या वस्तू अधिक महाग होतील. कारण त्यामध्ये तांबे अधिक वापरले जाते, असे उद्योजकांनी सांगितले. त्याचबरोबर स्थानिक पंखा उत्पादकांनी महागड्या तांब्यामुळे किंमती वाढवाव्या लागतील, असे सांगितले. अशा परिस्थितीत स्थानिक उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे. वर्षभरात तांब्याच्या किंमतीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून अजूनही ही वाढ थांबायला तयार नाही. छोट्या उद्योजकांचे म्हणणे आहे, की त्यांच्या पॅकेजिंग खर्चातही सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत स्टीलची किंमत प्रति टन 40 हजार रुपयांवरून 58 हजार रुपये प्रतिटन झाली आहे आणि तरीही किंमती वाढतच आहेत. उद्योजक सांगतात, की किंमतीवरील सर्व ओझे ग्राहकांवर टाकता येत नाही. याचा विक्रीवर परिणाम होणार आहे. स्टीलसह सिमेंटच्या किंमतीत वाढ झाल्याचे लक्षात घेता बांधकाम व्यावसायिकांनीही सरकारला स्टील व सिमेंटचे दर स्थिर करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button