
अमरावती, दि. 4 : जिल्ह्यात आतापर्यंत 859 कोटी 10 लक्ष रूपये इतक्या निधीचे खरीप पीक कर्ज वितरण झाले आहे. ही रक्कम उद्दिष्ट्याच्या 50 टक्के इतकी आहे. तथापि, उद्दिष्टानुसार कर्ज वितरण होणे आवश्यक असून, या कामाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वितरण, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेताना ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँकेचे जितेंद्रकुमार झा यांच्यासह अधिकारी व बँक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी होत असताना त्याद्वारे कर्जमुक्त झालेल्या शेतकरी बांधवांना नव्याने कर्ज मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कर्ज वितरणाचे प्रमाण वाढवावे. त्यासाठी बँकांनी गतीने काम करणे आवश्यक आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अद्यापही नऊ हजार शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे. सीएससी सेंटरच्या माध्यमातून हे काम होऊ शकेल. त्याची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी व हे काम पूर्ण करून घ्यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.