मराठी

“पीक कर्ज वितरणाला गती द्यावी”

- पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर

अमरावती/दि. 15 – जिल्ह्यात पीक कर्ज वितरण उद्दिष्टानुसार पूर्ण झाली पाहिजे. त्यादृष्टीने वितरणाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अद्यापपर्यंत 627 कोटी 98 लाख रूपये पीक कर्ज वितरण झाल्याची माहिती लीड बँकेचे श्री. झा यांनी यावेळी दिली. कर्जवितरणाच्या या कामाला गती द्यावी. शेतकरी बांधवांची अडचण जाणून त्यांना कर्ज मिळवून देण्यात सहकार्य करावे. खरीपासाठी शेतकरी बांधवांना कर्ज मिळावे यासाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेद्वारे अनेक शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. या पात्र शेतकरी बांधवांना कर्जवितरणाचा लाभही देण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात वाळूच्या तस्करीबाबत तक्रारी येत असून, त्याबाबत कठोर कारवाई करून अशा प्रकारांना वेळीच आळा घालावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व महापालिका यांच्याकडून होत असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली व उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश दिले. कोविड रूग्णालयात ऑक्सिजन सुविधांची पुरेशी उपलब्धता करून देण्यात आली आहे. आवश्यक तिथे डबल ऑक्सिजन यंत्रणाही पुरविण्यात आली आहे, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.

Related Articles

Back to top button