मराठी

महाबीजसह पाच कंपन्यांवर कारवाई

बोगस बियाणे प्रकरण; न्यायालयात दावे

अकोला/दि. ७ – अखेर बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. सोयाबीन बियाणे न उगवल्याप्रकरणी अकोल्यातील बार्शीटाकळी न्यायालयात महाबीजसह तीन कंपन्यांविरूद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. याआधी जिल्ह्यातील मूर्तिजापूर न्यायालयात दोन कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हे खटले दाखल केले आहेत. बार्शीटाकळी तालुका न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये ‘महाबीज‘सह वरदान बायोटेक आणि केडीएम सीड्स या कंपन्यांचा समावेश आहे. मूर्तिजापूर न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये सारस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज आणि प्रगती अ‍ॅग्रो सव्र्हिसेस या दोन कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी काही कंपन्यांवर अकोला कृषी विभाग पुढच्या काही दिवसांमध्ये खटले दाखल करणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांचे ४९ नमूने तपासणीसाठी घेतले होते. हे सर्व नमुने नागपूरच्या बीज प्रमाणीकरण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील ११ नमुने अप्रमाणित निघाले. पाच कंपन्यांचे बियाणे सदोष निघाले. या पाचही कंपन्यांना कृषी विभागाने कारवाईसाठी नोटीस दिली. या कंपन्यांचे उत्तर अपेक्षित न आल्याने अखेर या पाच कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले.

Back to top button