मराठी

रेमडेसिविरच्या साठेबाजांवर करावी कारवाई

निलेश विश्वकर्मा यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

अमरावती/ दि.२४ – ती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे केवळ अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात रूग्णसंख्येचा स्फोट झालेला आहे. कोरोनावर कुठलाही ठोस उपचार नसला तरीही रेमडिसिविर या औषधाचा वापर रूग्णांना बरे करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. परंतू दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या औषधाच्या मागणीमुळे काही साठेबाजांनी या औषधाची साठवणूक करून काळाबाजार सुरू केलेला आहे. पाच हजारांच्या आसपास किंमत असलेले हे औषध सध्या दहा ते पंधरा पट चढ्या दराने विक्री केल्या जात असल्याची भयंकर स्थिती असून त्यावर प्रशसनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचा आरोप निलेश विश्वकर्मा यांनी केला आहे. आरोग्य विभागाने या औषधाचे पुरवठादारांना तंबी देऊन त्याची साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा युवा नेते निलेश विश्वकर्मा यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाचा फैलाव जोरात सुरू असून सध्याच्या स्थितीत शासकीय आणि खासगी रूग्णालयांमध्ये रूग्ण दाखल करायला देखील बेड शिल्लक नाहीत. शासनाने बेडच्या संख्येत वाढ करण्याची मागणी अगोदरच करण्यात आली आहे. परंतू त्यासोबतच आता कोरोनावर उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या काही औषधांचा काळाबाजार करून नागरिकांची लूट काही साठेबाजांनी सुरू केली असून त्यावर कुठलेही नियंत्रण आरोग्य विभागाचे नसल्याचे दिसून येते. शहरी आणि ग्रामीण भागात पाच हजार रूपयांची किंमत असलेले रेमडिसिविर नावाचे औषध तब्बल ५० ते ८० हजार रूपये एवढ्या प्रचंड चढ्या दराने विक्री केल्या जात आहे. रूग्णांना वाचविण्यासाठी नागरिक नाईलाजाने ते खरेदी करित आहेत. विशेष म्हणजे यात अनेक पुरवठादार तसेच डिस्ट्रीब्युटर्सचे साटेलोटे असण्याची शक्यता असून शासनाने तसेच पोलिस प्रशासनाने देखील आत या औषधाच्या साठेबाजीवर कडक निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याचे निलेश विश्वकर्मा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
भविष्यात या औषधांची मागणी आणखीन वाढण्याची शक्यता असून शासनाने त्यावर एक संनियंत्रण समिती नेमून त्यावर लक्ष ठेवावे. शासनाने जिल्ह्यातील साठेबाजांवर कारवाई करून अधिक दराने विक्री करणाऱ्यांचे लायसंस ऱद्द करावे अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील विश्वकर्मा यांनी दिला आहे.

अन्न व औषध प्रशासन झोपेत

औषधांचा काळाबाजार सुरू असतानाच नेहमीप्रमाणे अन्न व औषध प्रशासन गाढ झोपेतच असल्याचा आरोप विश्वकर्मा यांनी केला आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी या औषधांची आवक जावक नियंत्रीत करून त्याचा पुरवठा सर्वत्र योग्य रितीने होतो किंवा नाही याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आरोग्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यभरात अशा साठेबाजांवर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे विश्वकर्मा यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button