अदाणी पोर्टसने डिबेंचर्सच्या माध्यमातून उभारले नऊशे कोटी
नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स च्या माध्यमातून केले जमा
मुंबई/दि. ११ – अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (NCD) च्या माध्यमातून 900 कोटी रुपये जमा केले आहेत. खासगी प्लेसमेंट तत्वावर एनसीडी जारी करून ही रक्कम उभी केली. शुक्रवारी कंपनीने 10 लाख रुपयांच्या 9000 सूचीबद्ध आणि रीडीमेबल एनसीडी देऊन 900 कोटी रुपये जमा केले. या एनसीडीची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मधील घाऊक कर्ज बाजारात यादी केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
देशातील सर्वांत मोठी लॉजिस्टिक्स कंपनी एपीएसईझेडमध्ये 11 बंदरे आणि टर्मिनल्स आहेत, जे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. त्यात गुजरातमधील मुंद्रा, दहेज, कांडला आणि हजीरा तसेच ओडिशामधील धमरा, गोव्यातील मोरमुगाव, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि चेन्नईमधील कट्टुपल्ली आणि एन्नोर यांचा समावेश आहे. देशातील एकूण बंदरांपैकी 24 टक्के बंदरे अदानी कंपनीकडे आहे. ही कंपनी केरळमधील विझिंजाम येथे म्यानमारमधील कंटेनर टर्मिनलवर ट्रान्सशिपमेंट बंदर विकसित करत आहे. मुंबई विमानतळाचा अदानी समूहाकडे ७४ टक्के हिस्सा आहे
अलीकडेच अदानी समूहाने मुंबई विमानतळावर 74 टक्के भागभांडवल घेण्याची घोषणा केली. मुंबई विमानतळामध्ये इतका मोठा हिस्सा संपादन केल्यावर उद्योगपती गौतम अदानी म्हणाले, “मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे जागतिक दर्जाचे आहे आणि मी असे उत्कृष्ट विमानतळ उभारल्याबद्दल जीव्हीके विमानतळ विकासकांचे कौतुक करतो.” करार संपल्यानंतर जीव्हीकेचा २६ टक्के हिस्सा असेल, तर अदानी समूहाची मुंबई विमानतळावर 74 टक्के भागभांडवल असेल. गौतम अदानी समूहाचे उद्दिष्ट देशातील सर्वांत मोठे विमानतळ ऑपरेटर बनण्याचे आहे. मुंबई विमानतळ हे देशातील दुसरे सर्वांत व्यस्त विमानतळ आहे.