मराठी

नामवंत कंपन्यांच्या मधात भेसळ

नवीदिल्ली/दि.३ – कोरोनाकाळात मधाची विक्री वाढली आहे; मात्र बाजारात विकल्या जाणाऱ्या ८० टक्के लहान-मोठ्या कंपन्यांच्या मधात भेसळ असल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
जर्मनीत १३ ब्रँड्सच्या २२ नमुन्यांची चाचणी झाली. यात केवळ पाच नमुनेच शुद्ध आढळले. विशेष म्हणजे यातील मोठे ब्रँड देशातील प्रयोगशाळेत भारतीय मानकांवर खरे उतरले होते. भारतातील चाचण्यांमध्ये सी-४ आणि सी-३ साखरेची भेसळ समजू शकली नाही. मधात सी-४ साखरेची भेसळ सामान्य असल्याचे दिसून आले. ऊस व मक्यापासून तयार होणारी साखर सी-४ गटातील साखर म्हटली जाते, तर तांदूळ आणि बीटपासून तयार साखर सी-३ गटात येते.
सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण म्हणाल्या,की प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मधाऐवजी आपण साखर खात आहोत. त्यातून वजन वाढते व आरोग्यासाठीही घातक आहे. कोविड-१९मुळे अधिक वजन असणाऱ्यांना जास्त भीती असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या भेसळयुक्त मधाचा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल, याचा विचार करा. भेसळ करणे गुन्हा आहे. चीनमधून सिरप व मधाची आयात सरकारने बंद करावी, असेही सुनीता यांनी सांगितले. अलिबाबासारख्या अनेक चिनी साइट्सवर मधात ५०-८०% सिरप मिसळला, तरी ते चाचणीत लक्षात येणार नसल्याचा दावा करत शुगर सिरप विकले जाते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत भारत ११ हजार टन शुगर सिरपची आयात करत असे. त्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त चीनमधून व्हायची; मात्र गेल्या काही वर्षांत भारतीय व्यावसायिकांनी चीनकडून तंत्रज्ञान विकत घेऊन उत्तराखंडातील जसपूर, उत्तर प्रदेशातील बिजनौर आणि पंजाबमधील बटाला येथे शुगर सिरपचे कारखाने सुरू केले आहेत. यातून सिरपची उपलब्धता आणि भेसळ सोपी झाली आहे.

Related Articles

Back to top button