कृषी पायाभूत सुविधांचा आज प्रारंभ
मोदी एक लाख कोटींची घोषणा करणार ; शेतक-यांना सहावा हप्ता मिळणार

नवी दिल्ली दि . ८ – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत एक लाख कोटी रुपयांच्या आर्थिक सुविधेची सुरुवात करणार आहेत. कृषी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी एक लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज देण्यात येणार आहे. अॉग्री-इन्फ्रा फंडाच्या स्थापनेला सरकारने जुलैमध्ये मान्यता दिली. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत साडेआठ कोटी शेतक-यांना १७ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करतील. अर्थसंकल्पातील घोषणेतूनच हा निधी वर्ग होणार आहे.
मोदी उद्या सकाळी ११ वाजता कृषी पायाभूत निधींअंतर्गत एक लाख कोटी रुपयांची वित्त सुविधा देणार आहेत. कोरोना मुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीतून सावरण्यासाठी सरकारने विविध घटकांसाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. या अॉग्री-इन्फ्रा फंडाचा कालावधी दहा वर्षे आहे. काढणीपश्चात तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेतीसाठी व्यवहार्य प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी मध्यम ते दीर्घ मुदतीपर्यंत कर्जपुरवठा करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागात खासगी गुंतवणूक वाढविणे आणि अधिकाधिक रोजगार निर्मिती करणे हे या योजनेचे वैशिष्ठ्य आहे.
या योजनेंतर्गत यावर्षी दहा हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले जाईल. विविध कार्यकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, कृषी-उद्योजक, स्टार्ट-अप आणि कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना कर्ज म्हणून बँक आणि वित्तीय संस्थांकडून कृषी पायाभूत सुविधा निधीतील एक लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. चार वर्षांत कर्ज वितरित केले जाईल. पुढील तीन आर्थिक वर्षांत प्रत्येक वर्षाला तीस हजार कोटी रुपये वितरित केले जातील.