मराठी

विमानतळ विकासकामे सहा महिन्यात पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे

पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर चे निर्देश

अमरावती, दि. 31 : अमरावती विमानतळ विकासाच्या प्रलंबित कामांबाबत तत्काळ माहिती सादर करावी व ही कामे येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

अमरावती येथील विमानतळ विकासाबाबत बैठक पालकमंत्री एड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके , माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता रजनी लोणारे आदी यावेळी उपस्थित होते.

प्राधिकरणाने डिसेंबरपर्यंत धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. तथापि, प्रशासकीय इमारत व इतर कामेही वेळेत पूर्ण होऊन विमानसेवेला प्रारंभ होणे आवश्यक आहे. त्यासाठी फेज-1 व 2 मधील कोणती कामे प्रलंबित राहिली, त्याची माहिती सादर करावी. कामांचे पुनर्नियोजन करून सहा महिन्यात कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यक तिथे शासनाकडे पाठपुरावा करू, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

विमानतळ विकासकामांत बडनेरा यवतमाळ राज्य वळण महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. विमानतळावर 1 लाख लीटर क्षमतेचे भूमिगत पाणीसाठी (जीएसआर)व्यवस्था झाली आहे.  संरक्षण भिंतीचे 15 कि.मी. लांबीचे बांधकाम हाती घेण्यात आले असून,  एटीआर 72-500 कोड सी-3 विमानाच्या तात्काळ उड्डाणासाठी आवश्यक साडेसात किमी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दुस-या टप्प्यातील 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

धावपट्टीचे विस्तारीकरण, टॅक्सीवे, अप्रॉन, आयसोलेशन बे, पेरिफेरल रोड, जीएसई एरिया, स्वच्छता यंत्रणा आदी कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत. ती डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. तथापि, प्रशासकीय इमारतीचे अंदाजपत्रक, निविदा तयार करण्याचे काम अद्यापही झालेले नाही. त्याला गती देऊन हेही काम वेळेत पूर्ण करावे जेणेकरून विमानसेवेला आरंभ होऊन शहराच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा व राज्य महामार्गाला जोडणारा 03. 10 किमी लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 49 चे मजबुतीकरण, सुधारणा, त्याचप्रमाणे, डीव्हीओआर सेक्शनजवळील निंभोरा- जळू  रोडचे बांधकाम या अडीच किलोमीटर लांबीच्या कामालाही गती द्यावी.

जिल्ह्याच्या औद्योगिक, वाणिज्यिक विकासाच्या दृष्टीने विमानतळ लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने प्रयत्न व्हावेत. याबाबत प्राधिकरणाच्या अधिका-यांसोबत मुंबईतही बैठक घेण्यात येईल व आवश्यक तिथे पाठपुरावा करू. मात्र, विकासकामांची गती मंदावता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

Related Articles

Back to top button