मराठी

अल कैदा-तालिबानी एकजुटीचे बायडेन यांच्यापुढे आव्हान

वॉशिंग्टन/दि. २८ – पाकिस्तानमधील तालिबानी हक्कानी नेटवर्कने अफगाणिस्तानात हल्ल्यांसाठी अल-कैदा बरोबर युती केली आहे. या दोन दहशतवादी संघटना मिळून नवीन युनिट तयार करत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमधून माघार घेताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.
अफगाणिस्तानात जवळपास तीन हजार अमेरिकन सैनिक आहेत. सध्या दररोज अफगाणिस्तानमध्ये कुठे ना कुठे तालिबानी स्फोट घडवून आणीत आहेत. एकीकडे तालिबानी सरकार आणि अमेरिकेशी वाटाघाटी करीत असताना न्यायधीश, पत्रकार, महिलांना लक्ष्य करीत आहेत. तालिबानी हक्कानी नेटवर्क आणि अल कैदाच्या एकत्र येण्याचा अहवाल तालिबानच्या प्रवक्त्याने फेटाळून लावला आहे; परंतु अमेरिकेच्या संरक्षण विभागाने मात्र त्याचा तपशील जाहीर केला आहे.
अमेरिका आणि अफगाणिस्तानने पाकिस्तानवर नेहमीच आरोप केला आहे. पाकिस्तान सैन्य, तेथील गुप्तचर यंत्रणा हक्कानी नेटवर्कला मदत करीत आहे, त्यात आता नावीन्य काही नाही. हक्कानी नेटवर्कच्या त्याच तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर हे दहशतवादी पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने त्यांच्या ठिकठिकाणी परत जातात. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये शीखांवर हल्ला झाला होता. हक्कानी नेटवर्कवरही या हल्ल्याचा ठपका ठेवण्यात आला होता आणि अफगाण गुप्तहेराने हे पुरावे अमेरिका, भारत आणि त्यांच्या सरकारला दिले.
बायडेन यांनी सत्ता घेतल्यानंतर अमेरिका-तालिबान करार रद्द करण्यात आला. त्यात मध्यस्थी करीत असतानाच पाकिस्तानने याचा विरोध केला. आता वित्त मंत्रालयाच्या अहवालानंतर अमेरिकेने तालिबानबरोबरचा करार का रद्द केला हे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे माजी चीफ ऑफ स्टाफ माईक मुल्लेन यांचा हवाला देताना या अहवालात म्हटले आहे, की तालिबान आणि आयएसआय यांच्यातील संबंधासाठी कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही. दोघेही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तालिबान्यांनी अमेरिकेच्या वित्त विभागाचा अहवाल नाकारला आहे. त्यांचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद म्हणाले, की आम्ही हे आरोप फेटाळले. तालिबान आणि अल कैदामध्ये कोणताही करार झालेला नाही. हा अहवाल आमच्या संस्थेला बदनाम करण्याच्या अमेरिकेच्या कटाचा एक भाग आहे.

 

Related Articles

Back to top button