मराठी

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत सर्वच ठराव नामंजूर

नगराध्यक्षांच्या गैरहजेरी उपाध्यक्षांनी घेतली बैठक : विरोधकांची सरशी

वरुड/दि. २२ – गेल्या काही दिवसांपासुन वरुड नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष व उपाध्यक्षांविरुध्द इतर नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर नगरपरिषदेमध्ये आता सत्तारुढ आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत. दोन गट पडल्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून मोठी अडचण निर्माण होत आहे. काल (ता.२१) नगराध्यक्षांनी बोलाविलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत उपाध्यक्षांनी ही सर्वसाधारण सभा घेतली खरी परंतु सादर केलेल्या ठरावाला विरोधी गटाने विरोध केल्याने एकही ठराव मंजुर होवु शकला नाही आणि अखेर अपेक्षेप्रमाणे एकही ठराव मंजुर न झाल्याने आता शहराकरीता महत्वपूर्ण मानल्या जात असलेली विकासाची कामे लांबणीवर पडणार आहे.
प्राप्त माहीतीनुसार, नगराध्यक्षा स्वाती आंडे यंानी गेल्या ९ सप्टेंबरला सर्वसाधारण सभेची नोटीस काढून ती २१ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व २४ नगरसेवकांना यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आली. या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून १८ विषय ठेवण्यात आले होते. त्यामध्ये अग्रिशामक वाहन खरेदी, वरुड शहरात दोन स्वागत गेटचे बांधकाम, शहराकरीता एक कार्डियाक अॅम्बुलन्स व एक साधी अॅम्बुलन्स खरेदी करणे, रेस्ट हाऊस जवळील छत्रपती शिवाजी चौकाचे सौंदर्यीकरण करणे यासह विविध विकासात्मक कार्याचा समावेश होता.
सभेच्या दिवशी दुपारी १२ वाजता सर्व नगरसेवक नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये हजर झाले मात्र नगराध्यक्षा वैद्यकीय कारणामुळे सभेला हजर राहणार नाही, अशी माहीती प्राप्त होताच नगरपरिषद उपाध्यक्ष मनोज गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु झाली. विशेष म्हणजे सर्वप्रथम २३ जुलैला घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्याबाबत सांगितले असता त्या इतिवृत्ताला सुध्दा विरोध झाल्याने ते सुध्दा कायम करण्यात आले नाही. त्यानंतर घेण्यात आलेले सर्व विषय सुध्दा १८ विरुध्द ६ अशा मतांनी नामंजुर करण्यात आले.
या बैठकीला मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांचेासह अन्य अधिकारी व कर्मचारी सुध्दा उपस्थित होते. दरम्यान या सर्वसाधारण सभेला विरोधी गटातील १८ पैकी १५ सदस्य उपस्थित होते तर उमेश उर्फ चंदू यावलकर, छाया दुर्गे व फिरदोस जहॉ या ३ नगरसेवक गैरहजर होते तर सत्तारुढ गटापैकी उपाध्यक्ष मनोज गुल्हाने, अॅड.योगेश चौधरी, हरिष कानुगो, शुभांगी खासबागे, मंदा आगरकर तर प्रहारे नगरसेवक मुन्ना तिवारी हे नगरसेवक उपस्थित होते. अखेर सादर केलेल्या ठरावाला विरोधी गटाने विरोध केल्याने एकही ठराव मंजुर होवु शकला नाही आणि अखेर अपेक्षेप्रमाणे एकही ठराव मंजुर न झाल्याने आता शहराकरीता महत्वपूर्ण मानल्या जात असलेली विकासाची कामे लांबणीवर पडणार आहे, एवढे मात्र निश्चित.

Related Articles

Back to top button