रेती वाहतुकीस परवानगी द्या अन्यथा चक्काजाम
रेती वाहक चालक संघटनेचा निवेदनाव्दारे प्रशासनाला इशारा
वरुड दी २६ – तालुक्यातील रेती वाहतुक करणारी वाहने हेतुपुरस्पर पकडुन त्यांचेवर आर्थिक दंडाची कार्यवाही केल्या जात असल्याने प्रशासनाने ही चुकीची कार्यवाही करणे बंद करुन आम्हाला रितसर रेती वाहतुकीचा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अन्यथा वरुड शहरात चक्काजाम आंदोलन करण्याचा ईशारा तालुक्यातील रेती वाहक चालक संघटनेने महसुल व पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनातुन दिला आहे.
वरुड तालुक्यातील रेती वाहक चालक संघटनेकडुन देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, आमचा रेतीचा व्यवसाय असुन त्याबाबत आम्ही शासनाच्या अटी व नियमांचे पालन करुन तसेच महसुल विभागाच्या परवानगी नुसार रॉयल्टी भरुन व्यवसाय करीत आहे. या व्यवसाया व्यतिरीक्त आमच्याकडे दुसरे कोणतेच उत्पन्नाचे साधन नाही. संपुर्ण जिल्ह्यात ओव्हरलोड रेतीची वाहतुक सुरू आहे. मात्र वरुड, मोर्शी तालुक्यात रेतीच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान आमच्या रेतीची वाहने पोलिस व महसुल विभागामार्फत हेतुपुरस्पर पकडुन त्यांचे विरुद्ध दंडात्मक कार्यवाही केल्याजात आहे. वरुड, मोर्शी तहसिलमधील वाहनांमध्ये २ टन रेती जरी असली तरी ती वाहने पकडुन त्यांचेवर मोठया प्रमाणात आर्थीक दंडाची कार्यवाही केल्या जात आहे. यामुळे आमच्या निवेदनावर गांभीर्याने विचार करुन आम्हास रितसर रेती व्यवसाय करण्याची परवानगी दयावी. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव येत्या २८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता वरुड शहरात चक्काजाम आंदोलन करावे लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असे निवेदनात नमुद करून हे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, तहसिलदार वरुड यांना देण्यात आले आहे.