मराठी
युवा अभियंत्याने बनविले सर्वसामान्यांना परवडणारे सॅनिटाईजर मशीन
मागणीही वाढली, सर्वत्र होतेय कौतुक
नांदगांव पेठ//दि.२७ – अमरावती जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोना रुग्ण चिंताजनक आहे. शिवाय ग्रामीण भागात देखील हे प्रमाण कमी होण्याचे चिन्ह नाहीत.याला मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील नागरिक वारंवार हात सॅनिटाईज करत नसल्याचे आढळून आल्याने येथील युवा अभियंत्याने घरगुती वापरण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना परवडेल अश्या दरात इलेक्ट्रिकवरील सॅनिटाईज मशीन तयार केली. विशेष म्हणजे एक मॉडेल बनविल्यानंतर या मशीनची मागणी देखील वाढलेली आहे. केवळ १५०० ते २००० रुपयांमध्ये ही मशीन आता कुणालाही उपलब्ध होऊ शकते ज्याचे बाजारमूल्य ४००० पेक्षाची जास्त आहे.
दर्शन अशोकराव जपुलकर असे त्या युवा अभियंत्याचे नाव आहे.अमरावतीच्या प्रवीण पोटे इंजिनिअरिंग महाविद्यालयातून त्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कमुनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केली असून तो पुण्यातील रिलायन्स सोलर कंपनीमध्ये अभियंता आहे.कोरोना मुळे तो सध्या नांदगांव पेठ येथील मूळ गावी वर्क फ्रॉम होम द्वारे कामकाज पाहत आहे. सोबतच फावल्या वेळेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत त्याने ऑटोमॅटिक सॅनिटाईजर मशीन तयार केली. यामध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर, महागडे कंट्रोलर,पुठ्ठा व एक लिटर पाण्याची बॉटल वापरून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अश्या माफक दरात हे यंत्र बनविले आहे.
वारंवार बॉटल मधील सॅनिटाईजर काढणे व हाताला लावणे याचा सर्वांना कंटाळा आलाय. मात्र हा कंटाळा स्वतःसाठी तसेच कुटुंबातील इतरांसाठी घातक ठरू शकतो त्यामुळे घराच्या मुख्य द्वारावर ही मशीन बसविली तर घरातील प्रत्येक सदस्य किंवा पाहुणे घरात प्रवेश करताना मशीन समोर हात ठेवून सॅनिटाईज होऊ शकतात. अश्या प्रकारची मशीन बाजारात अधिक दराची असल्याने सर्वसामान्य नागरिक ते घरी घेऊ शकत नाही त्यामुळे दर्शन जपुलकर या अभियंत्याने फावल्या वेळेत हे यंत्र तयार करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.एक यंत्र तयार करायला चार ते पाच तासांचा अवधी लागत असून न नफा ना तोटा या तत्वावर दर्शन हे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. या यंत्राचे कौतुक होत असून नागरिकांची मागणी देखील वाढली आहे.
हा काळ फार वाईट आहे. ग्रामीण भागात देखील रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी सतर्क राहणे, सॅनिटाईजर व मास्क वापरणे तसेच सामाजिक अंतर पाळणे हाच कोरोनापासून बचावाचा मार्ग आहे. त्यामुळेच हे यंत्र तयार केले असून सॅनिटाईजर मशीन सोबत सॅनिटाईज आणि हँडवॉश एकाच मशीन मधून होईल असे यंत्र लवकरच बनवणार असल्याचे दर्शन जपुलकर याने माध्यमांशी बोलतांना सांगितले.