मराठी

इंदुरीकर प्रकरणात अंनिसचेही वकीलपत्र

१६ सप्टेंबरला सुनावणी

नगर/दि.२० – कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ती आता १६ सप्टेंबरला होणार आहे; मात्र या प्रकरणात मूळ तक्रारदार असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे यांनीही वकीलपत्र सादर केले आहे. पुढील सुनावणीच्या वेळी सरकार पक्षासोबतच त्यांनाही बाजू मांडता येणार आहे. कीर्तनातून ‘पीसीपीएनडी‘(PCPND) कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. त्याला त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. संगमनेरच्या सत्र न्यायालयाने या खटल्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. आज सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. बी. जी. कोल्हे हजर झाले. तसेच अ‍ॅड. गवांदे यांनीही या प्रकरणात आपल्याला बाजू मांडायची असल्याचे सांगत तसा अर्ज सादर केला. गवांदे या प्रकरणातील मूळ तक्रारदार आहेत. या घटनेची केवळ चर्चा सुरू असताना ड. गवादे यांनीच प्रथम अधिकृत तक्रार आणि व्हिडिओसंबंधीचे पुरावे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सादर केले होते. त्यानंतरच इंदुरीकरांविरुद्ध खटला दाखला झाला आहे.

मुख्य म्हणजे त्यामध्ये आरोग्य यंत्रणेने गवांदे यांना साक्षीदारही केलेले आहे. मूळ खटल्याची सुनावणी होईल, त्या वेळी नियमानुसार त्यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. सध्या स्थगितीसंबंधीच्या सुनावणीतही मूळ तक्रारदार म्हणून बाजू मांडण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात आरोग्य यंत्रणेची म्हणजेच राज्य सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी नुकतीच जिल्हास्तरीय पीसीपीएनडी सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सरकारी वकिलांशी समन्वय ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे विधी सल्लागार अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. आज तेही न्यायालयात उपस्थित होते. अर्जावरील सुनावणीचे कामकाज आज होऊ शकले नाही. आता त्यावर १६ सप्टेंबरला कामकाज होणार आहे. त्या वेळी सरकारतर्फे म्हणणे सादर करण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button