आणखी एका पक्षामुळे ममतादींदीची डोकेदुखी वाढणार
कोलकाता/दि.१५ – पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील मुस्लिमांचे मुख्य श्रद्धा केंद्र असलेल्या फुरफुरा शरीफचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली आहे. 21 जानेवारी रोजी ते या पक्षाचे नाव जाहीर करतील. या नवीन पक्षामुळे ममता दीदींची डोकेदुखी वाढणार आहे. त्याचे कारण ममतादीदींच्या मतपेढीलाच हा पक्ष धक्का देईल.
मुस्लिम, दलित आणि आदिवासींचा समावेश असलेल्या या संघटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठे राजकीय वळण लागू शकते. यासंदर्भात पीरजादा अब्बास सिद्दीकी म्हणाले, की मी 21 जानेवारी रोजी नवीन पक्ष स्थापन करणार आहे. हा पक्ष पश्चिम बंगालमधील मुस्लिम, दलित, आदिवासींसाठी एक व्यासपीठ असेल. गेल्या काही महिन्यांत बरेच आदिवासी आणि दलित प्रतिनिधी माझ्याकडे आले. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांचे नेतेही माझ्याकडे चर्चेसाठी आले. विधानसभा निवडणुकीत 60-80 जागांवर लढण्याचे आमचे लक्ष्य आहे. फुरफुरा शरीफ यांच्या मौलवींनी जेव्हा उघडपणे राजकारणात प्रवेश केला, तेव्हा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनीही त्यांची भेट घेतली. त्यांनी सिद्दीकी यांच्यांशी निवडणुकीची बोलणी केली.
या बैठकीनंतर सिद्दीकी यांनी ग्रामीण उत्तर व दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यात आयोजित धार्मिक समारंभात नवीन पक्ष स्थापण्याची शक्यता व्यक्त केली. उत्तर २४ परगणामधील कदंबगाची येथे अशाच एका मिरवणुकीत बोलताना सिद्दीकी म्हणाले, की ओवेसींचा क्लोन असल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येत होता. तृणमूल काँग्रेसच्या अल्पसंख्याकांच्या मतांना खिंडार पाडून भाजपचे काम सोपे करण्याचा आरोपही माझ्यावर होतो; परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मी राजकारणात नव्हतो, तरीही पश्चिम बंगालमध्ये भाजपला 18 जागा मिळाल्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता असताना भगव्या पक्षाला इतक्या जागा कशा मिळल्या? डाव्या आघाडीच्या कारकीर्दीत राज्यात भाजपला एवढे यश मिळताना आम्ही कधी पाहिले नाही. तृणमूल काँग्रेसने आमच्याशी विश्वासघात केला आहे.
काही प्रख्यात मुस्लिम, आदिवासी, दलित प्रतिनिधींनी अत्याचारग्रस्तांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवावी अशी गळ मला घातली आहे. गेल्या 73 वर्षांपासून त्यांना पश्चिम बंगालमध्ये विश्वासार्ह आवाज मिळाला नाही, अशी टीका त्यांनी केली.