मराठी

बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य

  • कामगार मंत्री ना. दिलीप वळसेपाटील यांचा कामगारांना दिलासा देणारा निर्णय .. .
  • आ. सौ सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे फलीत .
अमरावती १६ ऑगस्ट :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय (जीविता )बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थ साहाय्य देण्यात येणार  आहे.   बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हफ्ता मंजूर करण्याबाबत कामगारमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे . या निर्णयाचा फायदा राज्यातील १० लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर  मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे . कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला . कोविड-१९ या विषाणूच्या प्रदुर्भाव कालावधीत २ हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हफ्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता . या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थ सहाय्याची रक्कम जमा करण्यात आली . यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले आहे . सद्या राज्यात लॉकडाउन कालावधीला टप्या -टप्याने शिथिलता देण्यात येत आहे . तथापी  इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत झालेली नाही . त्यामुळे बांधकाम कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . हि बाब विचारात घेऊन नोंदीत बांधकाम कामगारांना ३ हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा दुसरा हफ्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे . नुकत्याच घेतलेल्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरु होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतकं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे .
अमरावतीमधील ८२ हजार नोंदणीकृत कामगारांपैकी ३८ हजार कामगार हे जीवित पात्र म्हणजेच नूतनीकरण झालेले आहेत . या ३८ हजार कामगारांच्या याद्या सुद्धा मंडळाकडे गेल्या असून आता पर्यंत २० हजार बांधकाम कामगार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने एप्रिल महिन्यातील प्रथम टप्यातील २ हजार  रुपयांचे आर्थिक सहाय्य जमा करण्यात आले आहे . उर्वरित १८ हजार जीवित पात्र बांधकाम कामगारांच्या खात्यातही  येत्या आठवड्यभरात  अर्थ सहाय्याची रक्कम  जमा होणार आहे . त्यामुळे लॉक डाउन काळात कामगारांना चांगलाच दिलासा मिळाला आहे . इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियमातील महत्वाच्या तरतुदी अंतर्गत कोणत्याही दिवशी १० किंवा त्यापेक्षा  जास्त कामगार कामावर ठेवणाऱ्या अशा सर्व आस्थापना कि ज्यात केंद्र व राज्य शासनांच्या संस्था , स्वायत्त संस्था , सिंचन , रेल्वे , विमान प्राधिकरण , म्हाडा, सिडको ,एमआयडीसी , सर्व नगर पालिका , महानगर पालिका , टेलिफोन ,विद्युत पारेषण , पूर नियंत्रण , बोगदे , पूल , इमारत , रस्ते , मार्ग , नेव्हिगेशन , तेल व वायूची जोडणी टाकणे , वायरलेस / रेडिओ / टेलिव्हिजन टॉवर्स इत्यादी बांधकामे करणाऱ्या सर्व आस्थापानांमध्ये कार्यरत कामगारांना याचा लाभ मिळणार आहे . लॉक डाउन काळात बांधकाम कामगारांना अर्थसाहाय्य मिळण्याबाबत अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देऊन शासनाने बांधकाम कामगारांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार सुलभाताई खोडके यांनी महाविकास आघाडी सरकार व कामगार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button