मराठी

खावटी अनुदान योजनेत पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन

अमरावती, दि. 22 : आर्थिक विवंचनेतील आदिवासी बांधवांना आधार देणारी खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी केले आहे.
कोरोना साथीचा प्रादुर्भाव, प्रतिबंधक उपाय म्हणून सुरुवातीला जारी करण्यात आलेले लॉकडाऊन, नंतर संचारबंदी आदींमुळे विविध अडचणी उभ्या राहिल्या. आदिवासी बांधवांपुढेही रोजगाराची अडचण उभी राहिली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत विकासकामे गतीने राबवण्यात येऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. आता खावटी योजनाही लागू करण्यात आली आहे. 2013-14 पासून ही योजना बंद होती.  आता या योजनेत 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार ही योजना एक वर्षासाठी सुरु ठेवण्यात येणार आहे.
या योजनेत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना एकूण 4 हजार रुपये कुटुंब अनुदान देण्यात येईल.  ज्यामध्ये 2 हजार रुपये किंमतीच्या वस्तू आणि 2 हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येईल.
या योजनेत मनरेगावर दि. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम जमातीची सर्व कुटुंबे, पारधी जमातीची सर्व कुटुंबे, जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे ज्यामध्ये परितक्त्या, घटस्फोटित महिला, विधवा, भूमीहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे, अनाथ मुलांचे संगोपन करणारी कुटुंबे, वैयक्तिक वन हक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबे यांना लाभ मिळणार आहे.
पात्र लाभार्थ्यांनी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास, धारणी येथे नियोजन अधिकारी वि. गु. धनगर (मो. क्र. 9545057759) किंवा वरिष्ठ लिपीक सी. एल. सोनवणे (मो. क्र. 7875828851) किंवा अधीक्षक एस. एन. चव्हाण (मो. क्र. 9370593558) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button