मराठी

भरडधान्य ज्वारी, मका व गहु खरेदीकरीता शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

आधारभूत किंमत खरेदी योजना

अमरावती, दि. १५ : शासनाने आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत रब्बी हंगाम 2020-21 वर्षासाठी ज्वारी, मका व गहू खरेदीकरीता जिल्ह्यात तालुकास्तरावर पिक पेऱ्यानुसार खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील संबंधित खरेदी केंद्रावर एप्रिल महिन्याभर 30 एप्रिलपर्यंत धान्याची नोंदणी करता येईल. धान्य खरेदी नोंदणीसाठी रब्बी पणन हंगाम 2020-21 मधील तलाठीच्या सही शिक्कानिशी पिकपेरा, ऑनलाईन 7/12, आधारकार्ड, आधार लिंक असलेले बँक खाते क्रमांक, बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन खरेदी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेचे खाते क्रमांक सादर करु नये. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर तसेच अमरावती जिल्हा मार्केटींग कार्यालय, धारणी आदिवासी विकास महामंडळाने केले आहे.

गहू धान्यासाठी 1 हजार 975 रुपये आधारभूत किंमत असून अमरावती, भातकुली तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी अमरावती तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. हे खरेदी केंद्र आहे.  नांदगाव खंडेश्वर तालुक्यासाठी नांदगाव तालुका सह. शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या., चांदूर रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार आदी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संबंधित तालुक्याचे तालुका सह. शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

ज्वारी धान्यासाठी  2 हजार 620 रुपये आधारभूत किंमत असून तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. हे खरेदी केंद्र उभारण्यात आले आहे.

मका धान्यासाठी 1 हजार 850 रुपये आधारभूत किंमत असून चांदूर रेल्वे तालुक्यात चांदूर रेल्वे तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. व मोर्शी तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था मर्या. खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

मेळघाटच्या शेतकऱ्यांसाठी धारणी, चिखलदरा तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाव्दारे खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली असून त्याठिकाणी मका व गहू ही दोन्ही धान्य खरेदी केल्या जाईल. धारणी तालुक्यात बैरागड, हरीसाल, सावलीखेडा, चाकर्दा, साद्राबाडी, चुरणी तर चिखलदरा तालुक्यात चुरणी व गौलेखेडा बाजार येथे धान्य खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहे.
उपरोक्त ठिकाणी त्या त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी धान्याची नोंदणी करुन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर तसेच अमरावती जिल्हा मार्केटींग कार्यालय, धारणी आदिवासी विकास महामंडळ यांच्याव्दारे करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button