पुणे/दि. १६ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला असून व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. तसेच तोंडी परीक्षेऐवजी आता उपयोजनात्मक चाचणी घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासूनच या आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. अभ्यासक्रमाबरोबरच बारावीच्या मूल्यमापन पद्धतही बदल करण्यात आला आहे. कला, वाणिज्य शाखेसाठी ८०/२० तर विज्ञान शाखेसाठी ७०/३० पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे; परंतु तोंडी परीक्षाऐवजी आता ऍक्टिव्हिटी शीट ‘ च्या माध्यमातून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी घोकंमपट्टी करून परीक्षेत उत्तरे लिहिण्याऐवजी वर्षभर घेतलेल्या ज्ञानाचे उपयोजन कसे करावे, यावर मूल्यमापन आराखडा तयार करताना लक्ष देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यातही काही बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी विचारल्या जाणाऱ्या एक, पाच आणि दहा गुणांच्या प्रश्नांऐवजी एक, दोन, तीन, चार ,पाच गुणांचे प्रश्नसुद्धा विचारले जाणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्नांचे प्रमाण सुमारे 25 टक्के असणार आहे. इयत्ता बारावीच्या इतिहास, भूशास्त्र, राज्यशास्त्र, बालविकास, वस्त्रशास्त्र, तर्कशास्त्र,अर्थशास्त्र ,पुस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन, चिटणीसाची कार्यपद्धती ,सहकार, कृषीविज्ञान, माहिती तंत्रज्ञान-विज्ञान, कला व वाणिज्य, शिक्षणशास्त्र, पर्यावरण व जलसुरक्षा या विषयांच्या सुधारित मूल्यमापन योजनेची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाणार आहे. सुधारित मूल्यमापनाबाबत राज्य मंडळामार्फत विषय निहाय ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात विषय शिक्षकांना विषय निहाय मूल्यमापन आराखडे व अन्य तपशील अवगत करून दिला जाणार आहे.
——
“एखादा विषय कळणे, समजणे यापलीकडे जावून आता विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे. त्यादृष्टीने मूल्यमापनात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. वाणिज्य शाखेतील काही विषयांसाठी विद्यार्थ्यांना ‘ केस स्टडी ‘ देवून त्यावर प्रश्न विचारले जातील. विचार करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळावी, यासाठी १ ते ५ गुणांचे प्रश्न विचारले जातील.”
– ज्योती गायकवाड, सदस्य, अभ्यासगट, बालभारती, पुणे