मराठी

शिक्षक-प्राध्यापकांना विमा कवच लागू करा

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी

अमरावती/दि.२६ – राज्यभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच सर्वत्र शिक्षक तसेच प्राध्यापकांना आता शाळामहाविद्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक आजवर कोरोनाबाधित झाले असून अनेकांचा त्यात जीव देखील गेला आहे. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने विमा कवच लागू केलेले असून सध्या शिक्षक देखील जीवावर उदार होऊन सेवेत हजर होत आहे. त्यामुळे सर्व शिक्षक तसेच प्राध्यापकांना देखील ५० लाखांचे विमा संरक्षण लागू करण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते प्रकाश काळबांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात सध्या शाळा महाविद्यालयांमधील कामकाज काही प्रमाणात सुरू झाले आहे. अनेक शाळांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये शिक्षक-प्राध्यापकांची उपस्थिती सुरू झाली आहे. विद्यापीठांच्या परीक्षा असल्यामुळे त्यांची शंभर टक्के उपस्थिती शासनाने अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षक चांगलेच अडचणीत सापडले आहे. अनेक शिक्षक ५५ वर्षांच्या वर तसेच ह्रदयरोग, रक्तदाब तसेच मधुमेहासारख्या आजारांनी बाधित आहेत. तरीही देखील त्यांना जीवावर उदार होऊन शाळेत उपस्थिती रहावे लागत आहे. त्यात कित्येक शिक्षक आजवर कोरोनाबधित झाले असून त्यात अनेक शिक्षकांचा जीव देखील गेलेला आहे.
मात्र या विषयाकडे शासन गंभीरतेने लक्ष देत नसल्याचे दिसून येते. पोलिस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा कवच शासनाने लागू केलेले आहे. मात्र कोरोनामुळे जीव गेलेल्या कर्मचाऱ्यांचे देखील कुटूंब आहे याचा विचार शासनाने करावा. त्यांचे कुटूंब सध्या उघड्यावर आले आहे याचाही विचार करावा. त्यामुळे इतरांसोबतच शिक्षक-प्राध्यापकांना देखील विमा सुरक्षा कवच लागू करावे अशी मागणी विमाशिच्या वतीने प्रकाश काळबांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. वैद्यकिय प्रतिपुर्तीच्या शासन निर्णयात बदल करा कोरोना बाधित शिक्षकांना शासन निर्णयातील अडथळ्यामुळे खासगी रूग्णालयात कोरोनावर घेतलेल्या उपचारांसाठी वैद्यकिय प्रतिपुर्तीचा लाभ घेता येत नसल्याचे दिसून आले आहे. अनेक शिक्षकांनी याबद्दल संघटनेकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे वैद्यकिय प्रतिपुर्तीच्या शासन निर्णयात कोविड १९ या आजाराचा समावेश करून बाधित कर्मचाऱ्यांनी केलेल्या हॉस्पीटलच्या खर्चाचे देयक त्यांना अदा करण्याची मागणी काळबांडे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button