मुंबई/दि.४ – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहेत. या प्रकरणावर भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ’हा लोकशाहीच्या चौथ्या खांबावर हल्ला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.
आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामीला राहत्या घरातून अटक केली आहे. यानंतर चौकशीसाठी अलिबागला नेण्यात येणार आहे. अर्णब गोस्वामीच्या अटकेमुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अन्वय नाईक यांची मुंबईत ’कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. मे 2018 मध्ये त्यांनी नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या घरामध्ये आत्महत्या केली. त्यांच्या खिश्यामध्ये एक सुसाईट नोट आढळून आली होती. या नोटमध्ये अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नीतेश सारडा यांनी आपले पैसे थकवले आहेत. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आली आहे. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली; परंतु कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे. याबाबत शाह यांनी ट्विट केले, की काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लज्जित केले आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करायलाच पाहिजे.
मागच्या सरकारने दाबली केस
नाईक यांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अर्णब गोस्वामीला अटक होण्यापूर्वीचा आहे. यामध्ये त्या म्हणत आहेत, की सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली हे वाईट आहे. अर्णब गोस्वामी यासाठी खूप ओरडतोय. माझ्या सासूबाईच्या आणि नवर्याच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार आहे. मागच्या सरकारने ही केस दाबून टाकली. या केससंबंधी मी दारोदारी फिरले. अजूनही मला न्याय मिळालेला नाही. मला न्याय कधी मिळणार. अर्णब गोस्वामी हा माझ्या कुटुंबीयांचा गुन्हेगार आहे आणि त्याला अटक ही झालीच पाहिजे. सर्व महाराष्ट्रातील बांधवांना मी विनंती करते, की नाईक कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी.